कोरेगाव पार्क : नागरी समस्या झाल्या उदंड ! चक्क घरांसमोर साचले सांडपाण्याचे तळे | पुढारी

कोरेगाव पार्क : नागरी समस्या झाल्या उदंड ! चक्क घरांसमोर साचले सांडपाण्याचे तळे

कोरेगाव पार्क(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील संत गाडगे महाराज वसाहतीत ड्रेनेजची लाइन तुंबल्याने सांडपाणी घरासमोरून वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून रहिवासी या समस्येचा सामना करीत असून, दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरवाजाबाहेर सांडपाणी वाहत असल्याने घरातून बाहेर पडायचे की नाही, असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

साऊथ रस्त्यालगत गाडगे महाराज वस्तीत सुमारे पाच हजार लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या वस्तीजवळून नाला वाहत आहे. प्रशासनाकडून या नाल्याची साफसफाई वेळच्यावेळी होत नाही. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज लाइन तुंबल्याने घरासमोरून सांडपाणी वाहत आहे. या पाण्याची परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून घरात यावे-जावे लागले असल्याने त्वचेचे आजार होऊ लागले आहेत. तसेच साथीच्या आजाराने अनेक जण आजारी पडत आहेत. या सांडपाणी वाहिनीची प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

संत गाडगे महाराज वसाहतीमध्ये तुंबलेल्या सांडपाण्याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही दुरुस्तीचे काम केले नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आंदोलन करावे लागेल.

-आदिनाथ कांबळे,
रहिवासी

या वस्तीलगत असलेल्या नाल्याच्या सीमा भिंतीचे आणि साफसफाईचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या मुख्य खात्याकडून करण्यात आले आहे. मात्र, सीमा भिंतीचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. क्षेत्रीय कार्यालय याबाबत काही करू शकत नाही.

-अशोक झुळूक,
उपअभियंता, महापालिका

हेही वाचा

राजकारणाची दशा पाहून चिंता वाटते; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

पुणे : बनावट पार्ट करणारे रॅकेट उद्ध्वस्त

रेल्वेच्या पुणे विभागात 17 वॉटर व्हेंडिंग मशिन

Back to top button