पिंपरी : अतिउत्साह ठरतोय जीवघेणा ! पावसाळ्यातील भटकंती करताना काळजी घेण्याचे आवाहन | पुढारी

पिंपरी : अतिउत्साह ठरतोय जीवघेणा ! पावसाळ्यातील भटकंती करताना काळजी घेण्याचे आवाहन

वर्षा कांबळे

पिंपरी(पुणे) : जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने मावळातील धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. सुटीच्या दिवशी पर्यटकांची तुफान गर्दी या पर्यटनस्थळी होत आहे; मात्र काही जण गर्दी टाळण्यासाठी धोकादायक निर्जन ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याच्या नादात आणि पाण्यात भिजण्याच्या आनंदात अपघातास आमंत्रण देतात.

गेल्या दोन दिवसांत लोणावळा, तसेच मावळातील कुंडमळा या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या तिघा पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे निसर्गात पर्यटनास जाताना प्रत्येकाने प्रथम आपला जीव महत्त्वाचा आहे; तसेच घरी आपले स्वकीय वाट पाहत आहेत, हे न विसरता पर्यटन करावे, असे आवाहनही दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमी संस्था तसेच स्थानिक पोलिसांकडूनही वारंवार करण्यात येते.

पावसाळ्यातील भटकंती करताना सुरक्षेच्या नियमांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोरोनाकाळात नागरिकांनी पर्यटनाचा मोह टाळला होता. पण आता त्यांच्या पर्यटनाच्या उत्साहाला उधाण आले आहे. मावळ हा परिसर पावसाळ्यातील धबधब्यांसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हिरव्यागार डोंगरारांगा आणि त्यावरून वाहणारे धबधबे आणि खाली उतरणारे ढग अशा विहंगम दृश्यात फोटोसेशन करण्यास लांबून पर्यटक येतात.

बेगडेवाडी येथील कुंडमळा याठिकाणी कुंडमाता देवी मंदिराजवळ असलेल्या बांधार्यात पाण्यात डुंबण्यासाठी व रांजणखळग्यांसह सेल्फी काढण्यासाठी पर्यटक येतात. याठिकाणी दरवर्षी अपघाताच्या घटना घडत असतात. रांजणखळग्यात पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात पाय घसरून पडल्यानंतर बाहेर येता येत नाही. पाण्यात पडल्यानंतर पाण्याच्या भोवर्यात व्यक्ती अडकल्यानंतर वाचण्याची शक्यता नसते. भोवरे मोठे असल्याने मृतदेहाच्या शोधण्यासाठी जीवरक्षकांना व पोलिसांना अनेक अडथळे येतात.

मावळमध्ये मळवली, वडेश्वर, ठोसेघर धबधबा, वाहनगाव, लोणावळ्यातील ड्युक्सनोज, लोहगड, राजमाची, कातळधारा धबधबा, भुशी डॅम आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते; तसेच शहरातील रावेत बंधारा आणि केजुबाई बंधारा याठिकाणी देखील धोकादायकरित्या सेल्फी आणि फोटोसेशन केले जाते; मात्र, पर्यटकांचे स्वत:च्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

पावसाळ्यात धबधबे सुरु झाल्यानंतर पाण्याबरोबर दगड व गोटेही वाहून येतात. बर्याचदा पाण्यातून वाहून येणारे दगड डोक्यात पडून अपघात झालेले आहेत. तसेच खडकावर आलेल्या शेवाळामुळे बर्याचदा पाय घसरतो. नागरिकांनी पर्यटनस्थळी जाताना पूर्णपणे सुरक्षा घेऊन आणि माहिती काढूनच पर्यटक करावे असे, आवाहन जीवरक्षकांकडून करण्यात येत आहे.

हे लक्षात ठेवा :

  • एकटे फिरायला जात असाल त्याठिकाणीच पूर्ण माहिती घ्यावी. कारण अनेकदा अपघात झाल्यानंतर सोबत कोणी नसल्याने मदत मिळत नाही. तसेच रस्ता चुकण्याची शक्यता असते.
  • अनोळखी ठिकाणी पोहायला किंवा फिरायला जाऊ नये.
  • मोठ्या ग्रुपमध्ये फिरायला जाणे टाळावे.
  • धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा.
  • दरी, उंच कडे, पाण्याची खोली जास्त असलेली अशी ठिकाणी.

पावसाळा सुरु झाल्यानंतर लोणावळा वरसोली या ठिकाणी तिघा तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नंतर कुंडमळा याठिकाणी एक तरूण बुडाला. तो सापडत नाही म्हणून त्याच्या मित्राने उडी मारली. त्याला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढला. तसेच बर्याच ठिकाणी पाय घसरून पडल्याच्या घटना घडतात.

-नीलेश गराडे, संस्थापक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था

बेगडेवाडी गावाच्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिअर लावणे गरजेचे आहेत. जेणेकरून पर्यटक त्याठिकाणी जाणार नाहीत. कुंडमळ्याच्या परिसरात लष ठेवणे अवघड जाते. ट्रेकिंगला जाताना सोबत माहितगार व्यक्ती असणे गरजेचे आहे, अन्यथा जंगलवाटात आपण चुकण्याचा धोका असतो. दिशा भरकटून आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे मोठे कठीण होवून बसते. अशा ठिकाणी कोणाची मदत मिळणे मोठे अवघड होवून बसते. कातळधारा धबधबा आणि ड्युक्सनोज याठिकाणी हरविण्याच्या घटना घडतात.

– महेश महाजन, संस्थापक, फ्रेंड्स ऑफ नेचर

हेही वाचा

कोरेगाव पार्क : नागरी समस्या झाल्या उदंड ! चक्क घरांसमोर साचले सांडपाण्याचे तळे

पुणे : बनावट पार्ट करणारे रॅकेट उद्ध्वस्त

राजकारणाची दशा पाहून चिंता वाटते; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

Back to top button