जरांगे यांच्याविरोधातील वॉरंट रद्द; न्यायालयात हजेरी, भरला दंड

जरांगे यांच्याविरोधातील वॉरंट रद्द; न्यायालयात हजेरी, भरला दंड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नाटकाच्या आयोजनानंतर निर्मात्यांचे पैसे न दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात वॉरंट बजाविल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. 31) सकाळी शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाले. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरल्यानंतर जरांगे यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. शिवबा संघटनेकडून 2013 मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते.

या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आले नव्हते, असा आरोप प्रेक्षकांनी केला. या गुन्ह्यामध्ये जरांगे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, सुनावणीस उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांना वॉरंट बजावले होते. या प्रकरणात जरांगे यांच्या वतीने पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष खामकर व महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या 'शंभूराजे' या नाटकाचे सहा प्रयोग 2013 मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये तक्रारदारांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले होते.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. याविषयी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. सर्वांनी कायद्याचा सन्मान राखायला हवा. तारीख असल्याने न्यायालयात आलो होतो. माझ्यावर काहीच आरोप नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही.

– मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news