कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून तलवारहल्ला प्रकरणी; दोघांना अटक | पुढारी

कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून तलवारहल्ला प्रकरणी; दोघांना अटक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : टिंबर मार्केट-सरनाईक कॉलनी रोडवर गुरुवारी रात्री झालेल्या खुनी हल्लाप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी एका अल्पवयीन हल्लेखोरासह दोघांना अटक केली. आदित्य विष्णू गुरव (वय 19, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. तलवार, कोयत्याने केलेल्या हल्ल्यात साहिल सतीश कांबळे (वय 19, रा. राजाराम चौक, शिवाजी पेठ) हा तरूण जखमी झाला होता.

संशयिताविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा तसेच भारतीय शस्त्र अधिनियम व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, जखमी साहिल हा टिंबर मार्केट- सरनाईक कॉलनी रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता मित्र राहुल चौगुले, ओमकार मुनीर, रोहित पाथरूटसमवेत बोलत थांबला होता.

संशयित आदित्य गुरवसह त्याचा अल्पवयीन साथीदार हातात तलवार, कोयता घेऊन पळत आले. ‘लायकी नसताना प्रेम करतोस, तुला जिवंत ठेवत नाही’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. गुरवने तलवारीने तर अल्पवयीन संशयिताने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केले. या घटनेत साहिल कांबळे गंभीर जखमी झाला.

भरचौकात झालेल्या खुनी हल्ल्याच्या प्रकारामुळे घटनास्थळ व शासकीय रुग्णालय आवारात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी झाली होती.

Back to top button