प्रांताधिकारी कट्यारेंनी मलाही दिली होती धमकी: बाळासाहेब चौधरींचा आरोप

प्रांताधिकारी कट्यारेंनी मलाही दिली होती धमकी: बाळासाहेब चौधरींचा आरोप

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी मलाही स्वतःला संपविण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करून धमकी दिली होती, असे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी (दि ३१) प्रांत अधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. खेड न्यायालयातील ५०० वकिलांनी त्यांच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच पत्रकारांना देखील ते अरेरावी करीत होते, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

चौधरी म्हणाले की, खेड तालुक्यातील रिंग रोड आणि महसुल प्रकरणातील काही संशयात्मक निकालाबाबत माहिती अधिकारात पत्र दिली. त्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुन्हा असे पत्र दिल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करेन, तसेच स्वतःला संपविण्यास प्रवृत्त केल्यावरून गुन्हा दाखल करून कायमचा बंदोबस्त करेन असा सरळ दम दिला होता. स्वतःला संपविण्याचा  शब्दप्रयोग वापरला म्हणुन घाबरून कोणतीही वाच्यता, तक्रार न करता मी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्याकडे जाणे टाळले; मात्र हा अधिकारी अतिशय भ्रष्ट असुन ब्लॅकमेल करणारा आहे. त्यातुन तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता इतरांवर ते आरोप करीत आहेत. म्हणुन माझ्याकडील पुराव्यांसह मी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आहे. माझ्याबरोबर तालुक्यातील पीडित शेतकरी सुध्दा असुन रविवारी (दि. २ जुन) पुणे-नासिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असे बाळासाहेब चौधरी यांनी म्हटले आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर कट्यारे यांनी आरोप केल्यानंतर त्यांची बाजु घ्यायची म्हणुन तुम्ही बोलत आहेत का? असे विचारता चौधरी म्हणाले की, मी सर्वांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. आमदार मोहिते पाटील यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अनेक प्रकरणात मी पत्र देऊन माहिती घेत कारवाई केली आहे. माहिती अधिकार कायद्या अंतर्गत आपण काही पत्र दिली. मात्र ती थेट निकाली काढून प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी माहिती देणे टाळल्याचा आरोप जाधव यांनी केला.
वांद्रे येथील माजी सरपंच संजय जाधव हेही यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news