Lok Sabha elections : पश्चिम बंगालमध्ये जमावाने ईव्हीएम मशिन तलावात फेकले | पुढारी

Lok Sabha elections : पश्चिम बंगालमध्ये जमावाने ईव्हीएम मशिन तलावात फेकले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या अंतिम टप्‍प्‍यातील मतदान आज होत आहे. आठ राज्‍यांमधील ५७ मतदारसंघांमध्‍ये ही प्रक्रिया पार पडेल. आज सकाळी मतदान सुरु झाल्‍यानंतर पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील एका मतदान केंद्रातील ईव्‍हीएम मशीन जमावाने तलावात फेकून देण्‍यात आल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील कुलताली येथील बूथ क्रमांक 40 आणि 41 येथील एका मतदान केंद्रात जमावाने प्रवेश केला. जमावाने ईव्हीएम व्हीव्हीपीएटी हिसकावले आणि तलावात फेकले. काही पोलिंग एजंटना मतदान केंद्रात उपस्थित राहण्याची परवानगी नाकारल्‍यानंतर हा प्रकार घडला. जमावाने ईव्हीएम व्हीव्हीपीएटी हिसकावले आणि तलावात फेकले.

अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर आज मतदान

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान होऊ घातलेल्या ठिकाणी एक कोटी 9 लाख मतदान केंद्रे आहेत. तिथे 10 कोटी 9 लाख कर्मचार्‍यांना नेमण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात 10 कोटी 6 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 5 कोटी 24 लाख पुरुष आणि 4 कोटी 28 लाख महिला मतदारांचा समावेश आहे.

अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 13 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल 9, बिहार 8, ओडिशा 6, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3 व चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.

मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच 3 केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यात भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 9, बिहारमधील 5, हिमाचल प्रदेश 4, झारखंड, ओडिशा आणि पंजाबमधील प्रत्येकी दोन आणि चंदीगडच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त 13 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा या सर्व जागा जातीय समीकरणात अडकल्या आहेत. कुशीनगर, देवरिया, सलेमपूर, बलिया, महाराजगंज आणि रॉबर्टस्गंज मतदारसंघात जातीच्या आधारावर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

बिहारमधील पाटलीपुत्र, आरा आणि बक्सरमध्येही जातीय समीकरणामुळे भाजपची वाट अवघड बनली आहे. आरा येथून केंद्रीय मंत्री आर. के. सिंह निवडणूक लढवत आहेत. पाटलीपुत्र येथून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती नशीब आजमावत आहेत. मीसा भारती यांची भाजपचे खासदार रामकृपाल यादव यांच्याशी टक्कर आहे. पंजाबमध्ये गेल्यावेळी भाजपने अकाली दलासोबतच्या युतीत 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे.

 

 

Back to top button