

प्रभाग क्रमांक : 18 वानवडी-साळुंखे विहार
आगामी महापालिका निवडणुकीत या प्रभागात कोणत्याही एका पक्षाचा विजय सहज, सरळ आणि सोपा असल्याचे वाटत नाही. प्रत्येक पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीवरून रुसवे, फुगवे पुढील काळात पाहायला मिळण्याची शक्यता असून, पक्षांना तिकिटाचे वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांत या प्रभागात अटीतटीची लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.(Latest Pune News)
प्रभागात गेल्या निवडणुकीत एक ओबीसी पुरुष व खुला वर्ग पुरुष प्रवर्ग आणि दोन महिला प्रवर्ग, असे आरक्षण होते. परंतु, या वेळी ओबीसी पुरुष असो किंवा महिला प्रवर्ग असो, सर्वच जागांवर लढण्याची तयारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरू आहे. गेल्या निवडणुकीत रुसव्या, फुगव्यांचा फटका असल्याने काँग्रेस पक्ष बॅकफूटला गेला होता. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी टिकेल का? हा प्रश्न असला तरी, या प्रभागात निवडणुकीचा महासंग््रााम पाहिला मिळणार असून, साम, दाम, दंड यांचा वापरही होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या निवडणुकीत या प्रभागात भाजपने दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. या प्रभागात ओबीसी हे एकच आरक्षण पडत आले आहे. दोन महिला, एक ओबीसी पुरुष आणि खुला पुरुष प्रवर्ग, अशा सर्वच जागांवर प्रत्येक पक्षात निवडणुकीत चढाओढ पाहायला मिळते. माळी आणि मराठा हे समीकरण पहिल्यापासून येथे चालत आलेले आहे. त्यामुळे ओबीसी जागेवर स्पर्धा पाहायला मिळते. त्या जागेवरून युती अथवा आघाडीमध्ये बिघाड झाल्यास नेत्यांची डोकेदुखी वाढते. परिणामी, ‘एकला चलो रे’चा नारा दिला जातो.
प्रभागात काही झोपडपट्टीचा भाग सोडला, तर उच्चभू सोसायट्यांची संख्या जास्त आहे. यामुळे सुशिक्षित मतदारांची संख्याही जास्त आहे. हा प्रभाग एनआयबीएम ते डोबरवाडी आणि नेताजीनगर ते 1/2 एसआरपीएफ गट या जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरात विस्तारला आहे. विस्तार मोठा असल्याने उमेदवरांची मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दमछाक होणार आहे. प्रभागात मतदारांची संख्या 84763 इतकी आहे. वानवडी गाव परिसरात मतदारांची संख्या जास्त आहे. यामुळे विविध पक्षांकडून वानवडीतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
महायुती आणि महाआघाडी एकत्र निवडणूक लढणार का? दोन्ही ठाकरे गट एकत्र येणार का? याबाबत अद्याप तरी संदिग्धता आहे. पण, त्या अगोदर सर्वच पक्षांतील इच्छुकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तीर्थयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे.
या प्रभागात सध्यातरी महायुती विरुद्ध महाविकास यांच्यात अटतटीची लढत दिसून येत आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष स्वतंत्र लढला, तर मात्र तिहेरी लढत अटळ आहे. जो नेता माळी-मराठा यांचा समतोल साधेल, त्यांचे वर्चस्व या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारांना तिकिटांचे वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
प्रभागाची रचना महायुतीला अनुकूल दिसत असली, तरी महाविकास आघाडीचा देखील परिसरात चांगला प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे स्वत: निवडणूक लढविणार की ते त्यांची आई माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप किंवा भाऊ राहुल जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, हे मुद्देही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे.
भाजपचे शहर सरचिटणीस ॲड. महेश पुंडे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रभागात चर्चा आहे. त्यांची आई माजी नगरसेविका कालिंदा पुंडे, माजी नगरसेवक धनराज घोगरे, दिनेश होले, कोमल शेंडकर यांना देखील निवडणूक रिंगणात उतरविले जाणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून मिळत आहेत.
काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी केदारी यांचा मुलगा ॲड. साहिल केदारी हे निवडणूक रिंगणात तगडे आव्हान उभे करू शकतात. माजी नगरसेवक अभिजित शिवरकर हे देखील निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रफुल्ल जांभुळकर आणि केविन मॅन्युअल यांची नावे देखील चर्चेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनेश सामल कोणता निर्णय घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट पडले. त्या वेळी प्रशांत जगताप यांनी आपली निष्ठा शरद पवार यांच्यावर दाखवली. त्याचे फळ देखील पवारांनी त्यांना दिले. सध्या पक्षाचे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. तसेच, हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही त्यांना संधी दिली होती. मात्र, थोड्या फरकाने ते पराभूत झाले. तुतारी हाती घेतल्यापासून जगताप यांनी भाजपविरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे शहरासह या प्रभागात महायुतीकडून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यामुळे शहरातील जबाबदारी आणि घरच्या मैदानातील लढाई जिंकताना जगताप यांचा कस लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : प्रशांत जगताप, राहुल जगताप, केविन मॅन्युअल, प्रफुल्ल जांभुळकर, रत्नप्रभा जगताप, शर्मिला जांभुळकर, सँड्रा मॅन्युअल, रोहन गायकवाड.
काँग्रेस : ॲड. साहिल केदारी, अभिजित शिवरकर, सविता गिरमे, रेखा जांभुळकर.
भाजप : ॲड. महेश पुंडे, धनराज घोगरे, दिनेश होले, समीर शेंडकर, अमित शेलार, प्रवीण खेडेकर, उमेश शिंदे, कालिंदा पुंडे, कोमल शेंडकर, पल्लवी केदारी,
स्मिता खेडेकर
मनसे : दिनेश सामल, श्रद्धा सामल.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : दिलीप जांभुळकर, प्रसाद चौगुले
शिवसेना (शिंदे गट) : मकरंद केदारी.
शिवसेना (ठाकरे गट) : रवींद्र जांभुळकर, ओंकार जगताप, स्वाती जगताप,
संगीता लोणकर