

नारायणगाव : जंगलतोड झाल्याने व सिमेंटची जंगलं वाढल्याने तसेच ऊस लागवडीचे क्षेत्र वाढू लागल्याने बिबट्या आता उसात वास्तव्य करू लागला आहे. त्याला बाहेर शिकार उपलब्ध होत नाही म्हणून तो माणसांवर हल्ले करतोय. बिबट-मानव संघर्ष वाढू लागल्याने वनखात्याने पकडलेले बिबटे गुजरात व दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पाठवले जाणार आहेत, तसेच तात्काळ एक हजार पिंजरे घेण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनमंत्री गणेश नाईक हे बेल्हे (ता. जुन्नर) येथे एका खासगी कार्यक्रमाला आले असता माध्यमांशी बोलत होते.(Latest Pune News)
वनमंत्री नाईक म्हणाले, बिबट्याचं संकट हे जुन्नर, आंबेगाव, शिरूर एवढ्यापुरत्याच सीमित राहिले नाही तर आता बिबट्याची समस्या महाराष्ट्रभर होऊ लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बिबट्याचे हल्ल्याने बळी गेले आहेत. जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यामध्ये ५५ हुन अधिक मानवाचे बळी बिबट्याने घेतले आहेत. बिबट्याचं संकट मोठे आहे त्या संदर्भात केंद्रीय कायदे किचकट आहेत, परंतु माणसाचा जीव देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कसा करता येईल, याबाबत सुद्धा सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न आहेत. त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर उपाययोजना सुरू केले असून जुन्नर व शिरूर तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांचा अधिकचा उपद्रव वाढल्याने पुणे जिल्ह्यासाठी १ हजार पिंजरे तातडीने खरेदी करण्यात यावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, यापुढे पकडलेले बिबटे सोडून न देता हे बिबटे गुजरात येथील वनतारा येथे पाठवण्यात येणार आहेत. वनताराची टीम माणिकडोह येथील निवारा केंद्रावर आली आहे. त्यांच्याशी देखील चर्चा सुरू आहे, तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा बिबट्यांची मागणी असून केंद्र सरकारच्या मदतीने तिकडे सुद्धा बिबटे पाठवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढे बिबट्याच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू होणार नाही याबाबतची खबरदारी वन खात्याकडून घेतली जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान जुन्नर तालुक्यातमध्ये ७०० ते ८०० बिबटे असावेत असा वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा अहवाल असला तरी प्रत्यक्षात १ हजार ५०० ते २ हजार बिबटे असावेत असा अंदाज खुद्द वनमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला.
दरम्यान शासनाकडून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले जाते, परंतु हे २५ लाख रुपये दिल्यावर माणूस काही परत जिवंत होऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे मानवावर बिबट्याचा हल्ला होणार नाही, याबाबतची उपाययोजना करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या असून बिबटे पकडण्याबाबतही तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.