

पुणे : शहरातील खासगी रुग्णालयात मेंदूत मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्रावाने ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या माध्यमातून परदेशी नागरिकाने केलेले हे पहिलेच अवयवदान आहे.(Latest Pune News)
मेंदूमृत 46 वर्षीय ही महिला भारताची ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्डधारक होती आणि मेलबर्न येथे राहत होती. दिवाळीनिमित्त भारतात आल्यावर तिला तीव डोकेदुखीचा त्रास झाला आणि पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिचे प्राण वाचू शकले नाहीत. तिचे पती आणि भाऊ यांनी अवयवदानास संमती दिली.
पुणे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी (नढउउ) च्या समन्वयक आरती गोकले यांनी सांगितले, पुणे विभागातून झालेला हा पहिलाच परदेशी नागरिकाचा अवयवदानाचा प्रकार आहे.
महिलेला दि. 2 नोव्हेंबर (रविवार) रोजी बेन डेड घोषित करण्यात आले. महिला ऑस्ट्रेलियन नागरिक असल्याने अवयवदानासाठी ऑस्ट्रेलियन दूतावासाची मंजुरी आवश्यक होती. रविवार असल्याने प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची होती. पण रुग्णालयाने तत्काळ दूतावासाशी संपर्क साधून आवश्यक परवानगी मिळविली, अशी माहिती समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अवयवांचे वाटप करण्यात आले. एक किडनी आणि यकृताचा डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय येथे, दुसरी किडनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर हृदय प्रत्यारोपणासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालय, मुंबई येथे पाठविण्यात आले. पुणे ते मुंबई असा ग्रीन कॉरिडॉर तयार करून हृदय वेळेत पोहचविण्यात आले. चारही रुग्ण स्थिर असून, उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.
महिलेला तीव स्ट्रोक आला होता आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतरही तिला वाचवता आले नाही. मात्र, तिच्या पती आणि भावाने धैर्याने अवयवदानास संमती दिली. त्यांच्या निर्णयामुळे इतरांचे जीव वाचले. दूतावासाशी संपर्क साधणे, प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे यासाठी सर्व डॉक्टर, ट्रान्सप्लांट समन्वयक आणि संबंधित टीमचा मला अभिमान आहे.
परमेश गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल
पुणे विभागात झालेले अवयव प्रत्यारोपण (1 जानेवारी ते 10 नोव्हेंबर 2025)
पुणे विभागात झालेले : 186
मूत्रपिंड : 106
यकृत : 59
हृदय : 4
मूत्रपिंड + स्वादुपिंड: 1
हृदय + फुप्फुसे : 1
फुप्फुसे : 11
मूत्रपिंड + हृदय: 1