Pune E-bus: पुणेकरांना केंद्राचे गिफ्ट! लवकरच हजार ई-बस
पुणे : पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी असून, केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ‘ई-बस’ खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.(Latest Pune News)
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लवकरच पीएमपीच्या ताफ्यात या बस समाविष्ट होतील. त्यातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक भक्कम होऊन, कोंडी कमी होईल तसेच प्रदूषण नियंत्रणासाठीही मदत होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीसह ’पीएमआरडी’च्या हद्दीत सेवा देणारी पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पीएमपीकडे सध्या 2000 बस आहेत. त्यातील सुमारे 750 स्वमालकीचा तर उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बस असणे आवश्यक आहे. म्हणून पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.यासाठी मोहोळ यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या वेळोवेळी प्रयत्न भेटी घेऊन पाठपुरावा केला होता, त्याला आता यश आले आहे.
या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साथ महत्त्वाची ठरली, ’या बसेससाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक असलेले पत्र राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठवले जावे, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आला. त्यानंतर या 1000 ’ई-बस’ साठीचा प्रस्ताव पीएमपीमार्फत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्याला गती मिळावी, यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच मी एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्लीत भेट घेत सविस्तर चर्चा केली होती. त्यांनीही तातडीने या प्रस्तावाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला 1000 ई बस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोहोळ म्हणाले. ’पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्यावर आमचा भर आहे. सध्या शहरात 32 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावते आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोही लवकरच धावू लागेल.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बसबाबतचा प्रस्ताव देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ.
मेट्रोच्या विस्तारित मार्गांनाही मान्यता मिळाली आहे. त्याच जोडीला पीएमपीचे सक्षमीकरण करणे हा माझा प्रमुख अजेंडा आहे. पीएमपीच्या ताफ्यात अधिकाधिक बस याव्यात, यादृष्टीने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरात लवकर या बस पीएमपीच्या ताफ्यात याव्यात, याला माझे प्राधान्य राहील.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री

