आमदार, खासदाराकडून हवी एक बस!

आमदार, खासदाराकडून हवी एक बस!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट करायची असेल तर शहरातील आमदार आणि खासदाराने प्रत्येकी एक बस आपल्या निधीतून पीएमपीला द्यायला हवी. यामुळे बसची संख्या वाढून पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ शकेल. पुणे शहराची लोकसंख्या 50 लाखांवर गेली आहे. महापालिकेच्या सर्वंकष आराखड्यानुसार पुणेकरांना व्यवस्थित बस सेवा पुरवायची असेल तर पीएमपीकडे साडेतीन हजार बस असणे आवश्यक आहे.

मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. 'पीक अवर'मध्ये तर अनेकांना गाडी मिळत नाही. बसला लटकून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर प्रवाशांचे हाल थांबवायचे असतील तर शहरातील आमदार, खासदारांनी आपल्या निधीतून एक बस पीएमपी प्रशासनाला देणे आवश्यक आहे. तर पुणेकर प्रवाशांची प्रवासासाठी होणारी दगदग काही प्रमाणात कमी होईल, असे पीएमपी प्रवासी मंचचे म्हणणे आहे.

ताफ्यात फक्त 2 हजार 181 बस

पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2 हजार 181 बस आहेत. 15 डेपो अंतर्गत या गाड्यांच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए भाग आणि काही ग्रामीण भागात 378 मार्गांवर बससेवा पुरविली जाते. याद्वारे 12 ते 13 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. या प्रवाशांकरिता किमान साडेतीन हजार बस हव्यात. मात्र, सध्या ही संख्या खूप कमी आहे. पीएमपी प्रशासनाकडूनसुध्दा दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर बस खरेदीचे नियोजन आहे. मात्र, या गाड्या ताफ्यात येण्यास किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही. आमदार, खासदारांनी प्रत्येकाने 1 बस दिली तर सुमारे 25 ते 30 बस पीएमपीच्या स्व: मालकीच्या होणार आहेत.

शहरासह पिंपरी आणि जिल्ह्याचा काही भाग मिळून सुमारे 30 आमदार, खासदार आहेत. या प्रत्येकाने 1 बस आपल्या निधीतून पीएमपीला दिल्यास प्रवाशांची काही प्रमाणात का होईना सोय होणार आहे. यापूर्वी अनेक आमदारांनी पीएमपीला अशा गाड्या आपल्या निधीतून दिल्या आहेत. विद्यमान आमदारांनीही आपल्या निधीतून नागरिकांच्या सोयीसाठी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पीएमपीला गाड्या घेण्यासाठी निधीचीही मदत मिळावी.

– संजय शितोळे,
मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

कुणी-किती दिल्या गाड्या?

1) आमदार लक्ष्मण जगताप : 2 एसी मोठ्या गाड्या
2) खासदार गिरीश बापट : 1 मिडी बस
3) आमदार विजय काळे : 1 मिडी बस
4) आमदार अनंत गाडगीळ : 2 मिडी बस
5) आमदार दिलीप कांबळे : 1 मिडी बस
एकूण : 7 गाड्या दिल्या

पुण्यात किती आमदार…
विधानसभा : 21
विधान परिषद आमदार : 00

पुण्यात किती खासदार…
लोकसभा : 3
राज्यसभा : 3

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news