

वाल्हे: यंदा खरीप हंगामातील पिकांना पावसाने झोडपले. आता रब्बी हंगामातही वातावरणातील बदलाने पिकांना फटका बसला आहे. वातावरणातील बदलाने कांद्यावर करपा, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
यामुळे वाल्हे (ता. पुरंदर) व परिसरात शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. प्रतिकूल हवामानामुळे कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले. शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकांवर केंद्रित झाल्या होत्या. अतिवृष्टीमुळे यंदा मुबलक पाणी उपलब्ध आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा या पिकांबरोबर कांदा पिकाची लागवड केली आहे. कांद्याला भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, अशी शेतक-यांना आशा आहे.
सुरुवातीच्या काळात चांगले वातावरण राहिल्याने पिकाची वाढ जोमदार झाली. सध्या थंडीही चांगली पडत आहे. मात्र, आता वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. ढगाळ हवामानामुळे पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
कांद्याची पात पिवळी पडू लागली आहे. दाट धुके पडण्याची शक्यता असल्याने पिकांचे शेंडे करपल्याप्रमाणे होऊन कांदा पिकाला बगळा रोग होऊन पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बदलत्या वातावरणाचा फटका कांदा पिकाला बसण्याची चिन्हे आहेत.