

शहरातील अनेक भागांत पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असतेच; मात्र त्या पोलिसांचा डोळा चुकवून काही महाभागांनी आपले मध्यरात्रीनंतर दारू पिण्याचे अड्डे तयार केले आहेत. शहरात ज्या ठिकाणी निर्जन दाट झाडीची ठिकाणे आहेत, अशा परिसरात रात्री 1 ते पहाटे 3 पर्यंत दारुडे पार्ट्या करतात. अपार्टमेंटच्या मागे, निर्जनस्थळी हे दारुडे येऊन बसतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.
खडक पोलिस, स्वारगेट भागातील दृश्ये अज्ञात व्यक्ती नियमितपणे खासगी जागा आणि कार्यालयांच्या परिसरात प्रवेश करतात, तिथे दारू पितात आणि दारूच्या बाटल्या तिथेच सोडून जातात. ही एक दैनंदिन डोकेदुखी बनली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती ’जैसे थे’ आहे. खडक पोलिस, स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांची गस्त किंवा प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. या निष्क्रियतेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी व रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस गस्त वाढविण्यासह कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
त्रस्त नागरिक, स्वारगेट
एकच रस्ता किती वेळा खोदता? हा रस्ता सिंहगड पीएमएवाय सोसायटी, वडगाव खुर्द या बाजूला आतमध्ये जाणारा आहे. हा रस्ता वर्षभरात आत्तापर्यंत दहा ते पंधरा वेळा खोदून पूर्णपणे खराब करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात हा रस्ता खोदला होता, आता पुन्हा खोदण्यात आला. तिन्ही ऋतूंमध्ये सातत्याने या रस्त्याचे खोदकाम करून संपूर्ण रस्ता खराब केला जात आहे. नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास होतो आहे. नेमक्या कामाच्या वेळी वाहतूक कोंडी आणि धूळ, चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. इतक्या वेळा खोदकामासाठी परवानगी महापालिका देतेच कशी? हा प्रश्न असून, संबंधितांवर कडक कारवाई करावी.
त्रस्त नागरिक, वडगाव
हुश्श.. अखेर कचरा उचलला इंदिरा-शंकरनगरी, गार्डन व्ह्यू एक्झिट गेट, पौड रोड, राहुल टॉवरजवळ या ठिकाणचे हे दृश्य होते. सहा महिन्यांपासून हा कचरा असाच पडलेला होता. तिसरा डोळामध्ये वृत्त येताच तो उचलण्यात आला आहे. महापालिकेचे ध्यन्यवाद.
किशोर आदमाने
वीजतारा खाली आल्या खडकवासला भागातील सांगरुण येथे खांबावरील विद्युत तारा काही ठिकाणी खाली हात पुरेल इतक्या अंतरावर लोंबकळत आहेत. याबाबत महावितरणच्या खानापूर कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली. मात्र, अद्यापही याची दखल घेतली नाही. सांगरुण भागात 1970 मध्ये पोल व तारा टाकल्या असून, ते पोल व तारा जीर्ण झाल्या असून, रात्री-अपरात्री तुटून खाली पडत आहेत. 55 वर्षांत महावितरण विभागाने जुना पोल व तारा एकदाही बदलल्या नाहीत. विद्युत पोलवरील तारा खाली लोंबकळत असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना जीव मुठीत घेऊन तिथून ये-जा करावी लागते, अचानक शेड व घरावर तारा पडल्याने घरांमध्ये विद्युतवाहक तारांचा करंट येत आहे.
विकी मानकर, खडकवासला
जरा इकडेही लक्ष द्या! टिळक रस्त्यावर यामाहा कंपनीचे शोरूम असलेल्या चौकात वीजतारा लोंबकळत आहेत. यापासून वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांना धोका आहे. महावितरण याची दखल घेईल काय?
रत्नाकर चांदेकर, सदाशिव पेठ