

मंचर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. असे असतानाच इच्छुक उमेदवारांच्या खर्चात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.
निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप न झाल्याने उमेदवारांना प्रचाराची स्पष्ट दिशा मिळत नसली, तरीही मतदारांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. सध्या अनेक इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघात सतत फिरत असून विविध सामाजिक, धार्मिक आणि नागरी उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत.
अखंड हरिनाम सप्ताह, मंदिर बांधकाम, तसेच गावातील नागरी सुविधा, सार्वजनिक कार्यक्रम यासाठी देणग्या देत मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर त्यांची ओळख वाढत असली, तरी यासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
निवडणूक जाहीर होण्यास उशीर होत असल्याने प्रचाराचा कालावधी अनौपचारिकरीत्या वाढला असून त्याचा थेट परिणाम खर्चावर होत आहे. उमेदवारांना सतत कार्यक्रमांना उपस्थित राहणे, संपर्क वाढवणे आणि सामाजिक उपक्रमांना मदत करणे अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे.
दरम्यान, निवडणुका नेमक्या केव्हा जाहीर होतील? याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले असून अधिकृत घोषणेच्या प्रतीक्षेत ते आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच प्रचाराला ठोस दिशा मिळेल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.