

मंचर: नववर्ष आणि थर्टी फर्स्टनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर, घोडेगाव आणि मंचर परिसरातील हॉटेल, लॉज व रिसॉर्ट सजले असून पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे येथील हॉटेल व रिसॉर्ट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी तसेच नागफणी, आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. याशिवाय हुतात्मा बाबू गेनू सागर, डिंभे धरण परिसर आणि अहुपे जंगल भाग पाहण्यासाठीही पर्यटकांची मोठी पसंती असते.
थंड हवामान, हिरवीगार वनराई आणि धार्मिक महत्त्वामुळे हा परिसर नववर्ष साजरे करण्यासाठी पसंतीस उतरत आहे. पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना व नागरिकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नववर्ष स्वागत शांततेत व सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आमच्या हॉटेलमधील बहुतांश खोल्या आधीच बुक झाल्या आहेत. भीमाशंकर दर्शन आणि निसर्गभमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्यावर आमचा भर आहे.
गणेशभाऊ कोकणे, रिसॉर्टचालक, शिनोली
थर्टी फर्स्ट आणि नववर्षासाठी यंदा कुटुंबीयांसह येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून शांत व सुरक्षित वातावरणात पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी केली आहे.
धनंजय फलके, हॉटेल मालक, घोडेगाव