Vidyanand Bapat: संतोष चव्हाणवर धमकी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल; बापटांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात, तपासात धक्कादायक माहिती

Vidyanand Bapat Attack: विद्यानंद बापट यांना धमकी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी संतोष चव्हाणला पुणे पोलिसांनी अटक केली असून, बापट यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vidyanand Bapat Attack
Vidyanand Bapat AttackPudhari
Published on
Updated on

Vidyanand Bapat Attack: विद्यानंद बापट यांना धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी संतोष चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. बापट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चव्हाणविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

विद्यानंद बापट माध्यमांशी बोलत असताना संतोष चव्हाण याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत संतोष चव्हाणला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, बापट यांच्या तक्रारीवरून धमकी, दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन गटांमध्ये वाद निर्माण होईल, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

बापटांच्या वक्तव्यामुळे हल्ला?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत विद्यानंद बापट यांनी यापूर्वी माध्यमांसमोर केलेली काही वक्तव्ये संतोष चव्हाण याला पसंत नव्हती, असे समोर आले आहे. या वक्तव्याचा मनात राग धरून त्याने बापट यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष चव्हाणविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१४ आणि २०१५ मध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या प्रकरणातील अधिक माहिती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

बापटांनी यापूर्वी पोलीस संरक्षण मागितले नव्हते

विद्यानंद बापट यांना हल्ल्याची शक्यता असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना होती का, याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. बापट यांनी यापूर्वी स्वतःला कोणाकडून धमकी मिळत असल्याचे पोलिसांना सांगितले नव्हते किंवा पोलीस संरक्षणाची मागणी केली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

बापट हे मोकळेपणाने आणि खुलेपणाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यामुळे त्यांच्याबाबत अशा प्रकारची घटना घडेल, याची माहिती नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हल्ल्यानंतर बापटांच्या सुरक्षेत वाढ

हल्ल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी बापट यांच्या सुरक्षेचे नव्याने आकलन केले असून त्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास एक PSO आणि चार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परिस्थितीनुसार सुरक्षा व्यवस्थेबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

महापालिकेच्या बैठकीदरम्यान यापूर्वी घडलेल्या प्रकारानंतरही त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी बापट यांनी कोणत्याही प्रकारची धमकी किंवा धोका असल्याचे पोलिसांना कळवले नव्हते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

बापटांच्या विरोधात तक्रारीही प्राप्त

विद्यानंद बापट यांच्या विरोधात काही तक्रारी अर्ज पोलिसांकडे प्राप्त झाले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या अर्जांची चौकशी करण्यात येत असून, तपासानंतर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, बापट यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीचीही असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

Vidyanand Bapat Attack
Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेझर बंदीला पाठिंबा; साउंड ॲण्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनची भूमिका

दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी पोलिसांची तयारी

आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनीही तयारी सुरू केली आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Vidyanand Bapat Attack
Vidyanand Bapat: विद्यानंद बापटांना पोलिसांकडून संरक्षण; आरोपीला उद्या कोर्टात हजर करणार; सीपींचा थेट इशारा, काय म्हणाले?

ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी कॅलिब्रेटेड मशीनची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित परिसरातील निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. दहीहंडी, गणेशोत्सव तसेच आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news