BJP on Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ भाजप नेते गणेश बीडकर मैदानात; म्हणाले, पुणेकरांच्या...'

Vidyanand Bapat Assault Pune: पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर अचानक हल्ला करून मारहाण करण्यात आली.
BJP on Vidyanand Bapat
BJP on Vidyanand BapatPudhari
Published on
Updated on

Vidyanand Bapat Assault Pune: पुण्यात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला गुरुवारी हिंसक वळण लागले. डीजेला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना अचानक एका व्यक्तीने हल्ला करून मारहाण केली. या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसळली असून, बापट यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या घटनेचा भारतीय जनता पक्षाकडून निषेध करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी बापट यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून, “ही घटना पुणेकरांच्या एकूण संस्कृतीला साजेशी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेश बीडकर म्हणाले की, विद्यानंद बापट यांच्यावर झालेली मारहाण ही एका सामान्य पुणेकराच्या मनातील भावनेच्या विरोधात आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच आपण तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. विद्यानंद बापट यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

BJP on Vidyanand Bapat
Vidyanand Bapat Attack: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? काय काम करतो? हल्ल्यानंतर काय म्हणाला?

“पुण्याची ही संस्कृती नाही. पुण्याचा खरा गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असं कृत्य कधीच करणार नाही. कोणीतरी भ्याडपणे हे कृत्य करून पुण्याच्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं काम केलं आहे,” असा घणाघातही बीडकर यांनी केला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असून, पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण परिस्थितीचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी बीडकर यांनी केली. “पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळांचे सर्व कार्यकर्ते कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

BJP on Vidyanand Bapat
Pune Black Spots: पुण्यातील ३८ ब्लॅक स्पॉट ठरले ‘डेथ झोन’; आठ महिन्यांत १८५ जणांचा बळी

दरम्यान, गणेश बीडकर यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधल्याचे सांगितले. मात्र, पोलीस आयुक्त बैठकीत असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तसेच पोलीस उपायुक्तांशीही आपले बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

“मी विद्यानंद बापट यांना भेटणार आहे. त्यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे,” असे गणेश बीडकर यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात डीजे, ध्वनीप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, या घटनेनंतर पुण्यातील वातावरण अधिकच तापले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news