धनकवडी : पुणे-सातारा रस्ता पद्मावती ते कात्रजपर्यंतच्या बीआरटी मार्गावरील पदपथावर अनधिकृत फळ विक्रेते, भाजीवाले, टोप्या-गॉगल, खेळणीवाले अशा विविध विक्रेत्यांनी आपले ठाण मांडले आहे. त्यामुळे पादचार्यांनी पदपथावरून चालायचे कसे, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्वारगेट ते कात्रज हा रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. पद्मावती ते कात्रजपर्यंतच्या पदपथावर छोट्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. परिणामी, पादचार्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. फळे, भाजी घेताना ग्राहक सर्रास आपली वाहने रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या धनकवडी, बालाजीनगरअंतर्गत रस्त्याच्या पदपथावर या परिसरासह सातारा रस्त्यावरील पदपथावर विक्रेत्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
त्यामुळे पदपथाचा वापर करताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे पादचाऱ्यांनी सांगितले. स्वारगेटकडून कात्रजकडे जाणार्या बीआरटी मार्गाच्या पदपथ तसेच त्रिमूर्ती चौक ते राजमाता भुयारी मार्गापर्यंतदेखील पदपथावर या अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. बीआरटी मुख्य रस्त्यावर पदपथ सोडून टेम्पो उभे करून आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, त्यामुळे वाहनचालकांना धीम्या गतीने मार्गक्रमण करावे लागत आहे. नागरिक पदपथाऐवजी रस्त्याचा वापर करत असल्याने अपघात घडण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
अनधिकृत फळ, भाजी विक्रेत्यांकडून खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते अन् अपघातसदृश परिस्थिती निर्माण होते. रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर अतिक्रमण केल्याने प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
धनकवडी, बालाजीनगरअंतर्गत रस्त्यावरील आणि सातारा रस्ता बीआरटी मार्गाच्या पदपथावरील अनधिकृत भाजी, फळ विक्रेत्यांना पर्यायी योग्य ती जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे अशाप्रकाराला निश्चितच आळा बसेल, असे अनधिकृत फळविक्रेत्यांनी सांगितले.