Shri Jewellers thieves arrested
पुणे: धायरी येथील रायकर मळा येथे श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात शिरून प्लास्टीकच्या पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटून नेणार्या दोन सराइतांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 ने भोसरी येथून बेड्या ठोकल्या. राजेश ऊर्फ राजू गालफाडे (40) आणि श्याम शिंदे (37, रा. दोघेही रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सराफाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
धायरी येथील रायकर मळा येथे काळुबाई चौकात श्री ज्वेलर्स सराफी पेढीत मंगळवारी (दि. 15) सराईत आरोपींनी दुकानात शिरून सोन्याचे दागिने चोरी करून दुचाकीवर पोबारा केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांची सात पथके आरोपीच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. तब्बल 80 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी रिक्षाने ससून रुग्णालयाच्या परिसरात गेले. तासभरानंतर तेथून त्यांनी भोसरी गाठली.
दरम्यान, आरोपी हा भोसरी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोघांना अटक करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, अंमलदार गणेश लोखंडे, सुरेश जाधव, शशिकांत नाळे यांनी केली.