निनाद देशमुख
Rutuja Varhade NDA पुणे : शाळेत असताना आकाशातील लढाऊ विमाने पाहून अंगावर शहारा यायचा. आपणही असंच उडावं, असं वाटायचं. बाबा लहानपणी लष्करी कार्यक्रमांना घेऊन जायचे. त्यांनी लष्कराचं दक्षिण मुख्यालय दाखवलं. एक दिवस एनडीएच्या संचलनाला देखील नेलं. एनडीएत मुलींची पहिलीच तुकडी दाखल झालेली. एनडीएतील वातावरण पाहून मी देखील भारावले. शिस्तबद्ध व लष्करी गणवेशातील कॅडेट्स पाहून आपणही सशस्त्र दलात जावं, हे मनाशी पक्क ठरवलं. स्वयंशिस्त घालून तीन वर्षं प्रचंड मेहनत घेत अभ्यास केला. अखेर मला यश मिळालं. आता एनडीतील पहिल्या दिवसाची प्रतीक्षा आहे, अशी भावना ऋतुजानं व्यक्त केली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पुण्यातील ऋतुजा वर्हाडे ही देशात मुलींमध्ये पहिली, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरी आली आहे. हे यश तिनं कसं मिळवलं याचा प्रवास तिनं ‘पुढारी’ला सांगितला. ऋतुजाचा प्रवास हा लष्करात जाऊ पाहणार्या अनेक मुला- मुलींसाठी प्रेरणादाई असाच आहे. ऋतुजा लहान असताना तिचं हवाई दलात पायलट व्हायचं स्वप्न होतं. या स्वप्नाला शक्ती देण्याची तिच्या वडिलांची भूमिका महत्त्वाची आहे. वेब डिझायनर असलेले तिचे वडील संदीप वर्हाडे हे तिला लहानपणी लष्कराच्या विविध कार्यक्रमात घेऊन जात असतं. ऋतुजाची आई जयश्री वर्हाडे या देखील गणिताच्या शिक्षिका असून त्यांनी देखील तिला नेहमी तिचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.
ऋतुजा नववीत असताना वडील संदीप यांनी तिला एनडीएच्या दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी नेले होते. प्रवेशद्वारातून आत जाताना ऋतुजा रोमांचित झाली होती. या ठिकाणी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर व कॅडेट्सचे दिमाखदार संचलन पाहून ती भारावली. एनडीएतील शिस्तबद्ध वातावरण पाहून या मानाच्या संस्थेतूनच पदवी घ्यायची हे स्वप्न उराशी घेऊन ऋतुजा संचलन पाहून बाहेर पडली. ती नववीत असताना एनडीएची दारे मुलींसाठी केंद्र सरकारने खुली केली. यामुळे तिच्या स्वप्नपूर्तीला उभारी मिळाली. तिने तीन वर्षे एनडीत जाण्यासाठी अभ्यास सुरू केला. 11 वीत असताना यशोतेज अकादमीत क्लास सुरू केले.
क्लासमधला अभ्यास ती रोज सरावासह करायची. सर्वात कठीण असणार्या एसएसबी मुलाखतीची देखील तिनं तयारी सुरू केली. एसएसबीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जात हा कठीण टप्पा पूर्ण करत ती देशात मुलींमध्ये पहिली आली. लष्करासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे असल्याने ती 3 किलोमीटर धावायची. तिने धावण्याची क्षमता हळूहळू 3 कि.मी. वरून 10 कि.मी.पर्यंत वाढवली. यामुळे ती शारीरिक चाचणीचादेखील महत्त्वाचा टप्पा पार करू शकली.
माझ्या या यशामुळे मला आनंद झाला आहे. माझे कुटुंबीय, मार्गदर्शकांचाही माझ्या यशात मोठा वाटा आहे. एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून लष्करासाठी पायलट होण्याचा मानस आहे. त्यासाठीची सीपीएसएस ही परीक्षाही दिली होती. नववीत असतानाच सैन्यात जायचे ठरवले होते. त्यामुळे एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी अकरावीपासून कसून मेहनत करायला सुरुवात केली होती.
ऋतुजा वर्हाडे
ऋतुजाला हवाईदलात पायलट व्हायचे होते. मात्र, तिला चष्मा असल्याने तिने एनडीए प्रवेशात लष्कराला प्राध्यानक्रम दिला. असे असले तरी तिने पायलट होण्याचे स्वप्न सोडले नव्हते. तिने पुन्हा पायलट होण्यासाठी आवश्यक असणारी चाचणी दिली. यात ती फिट झाली आहे. त्यामुळे ती आर्मी एव्हिएशन विंगमध्ये पायलट होणार आहे.
संरक्षण दलाच्या लष्कर, नौदल आणि हवाईदल या तीनही शाखांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दिले जाते. संरक्षण दलात मुलींनाही समान संधी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 2021 मध्ये पहिल्यांदा मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारे खुली करण्यात आली. त्यानुसार 2021 मध्ये प्रवेशित मुलींची पहिली तुकडी मे महिन्यात बाहेर पडणार आहे.