

वेल्हे: खून केल्यानंतर तब्बल 24 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हिऱ्या ऊर्फ हिरामण शिवराम पवार (वय 43, रा. कलकतवाडी, ता. महाड, जि. रायगड) या आरोपीला वेल्हे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून अटक केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून या आरोपीला गुरुवारी (दि. 16) ताब्यात घेण्यात आले.
नोव्हेंबर 2002 मध्ये वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव खुर्द (ता. राजगड) येथे एका खुनाची घटना घडली होती. मयत बाबूराव रामभाऊ मरगळे आणि आरोपी यांच्यात तंबाखू मागण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादात आरोपीने बाबूराव यांना काठीने गंभीर मारहाण करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी वेल्हे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता.
पुणे ग््राामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकातील सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी रायगड जिल्ह्यातील महाड परिसरातील वारंगी, छत्री निजामपूर, वाळण या गावांच्या डोंगरदऱ्यात वास्तव्य करत होता.
आरोपीने त्याची ओळख पटू नये म्हणून नाव बदलले होते आणि तो मोबाईलचा वापरही टाळत होता. पोलिसांनी वेषांतर करून लाकूडतोड व्यापारी असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीला संशय आल्याने त्याने डोंगरात पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहायक फौजदार प्रदीप कुदळे, पोलीस हवालदार सोमेश राऊत व इतर कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.