

पुणे: भागीदारी संस्थेच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप फिर्यादीमध्ये केला आहे. या प्रकरणात श्रीकांत मोहन ठुसे, संज्योत श्रीकांत ठुसे, श्रीपाद मोहन ठुसे, सिद्धी ठुसे, संकेत ठुसे आणि सागर पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गणेश भाऊसाहेब पठारे (वय 38, रा. बाणेर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, ‘गौरी वेअर हाऊस’ या भागीदारी संस्थेची स्थापना 13 मार्च 2001 रोजी केली होती. या संस्थेत त्यांच्या आई मंगला पठारे यांचा 50 टक्के, तर श्रीकांत मोहन ठुसे व श्रीपाद मोहन ठुसे यांचा प्रत्येकी 25 टक्के हिस्सा होता. पुढे 18 ऑक्टोबर 2006 रोजी ‘रिटायरमेंट कम ॲडमिशन डीड’द्वारे श्रीपाद ठुसे निवृत्त झाले आणि संज्योत ठुसे व गणेश पठारे यांचा नवा भागीदार म्हणून समावेश करण्यात आला.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या मूळ डीडमध्ये नंतर संगनमत करून फेरफार करण्यात आले. डीडमधील ‘इनकमिंग पार्टनर’ या नोंदीत बदल करून ‘कंटिन्युइंग पार्टनर’ असा उल्लेख करण्यात आला. तसेच, बँक खाते हाताळण्याच्या अधिकारांमध्येही अनधिकृत बदल करण्यात आले. या फेरफार केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तयार करून त्या अधिकृत असल्याचे भासवण्यात आले.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, या बनावट दस्तऐवजांचा वापर करून म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, उच्च न्यायालयातही हीच कागदपत्रे खरी असल्याचे दाखवून सादर केल्याचा आरोप फिर्यादित केला आहे.
तक्रारदारांना माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागीदारी संस्थेचे मूळ दस्तऐवज नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले, जे नियमबाह्य असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ‘महाराष्ट्र भागीदारी नियम, 1989’नुसार कार्यरत संस्थांचे मूलभूत दस्तऐवज नष्ट करता येत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले आहे. दि. 18 नोव्हेंबर 2024 ते 9 जून 2025 या कालावधीत उपनिबंधक, भागीदारी संस्था कार्यालयात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.