

खोर: दौंड तालुक्यासह परिसरातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावात सध्या केवळ ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्याबाबत अद्याप कोणतेही संकेत नाहीत.
त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. व्हिक्टोरिया तलावातील पाण्यावर दौंड तालुक्यातील आठ गावांमधील जलजीवन मिशनच्या योजना, बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई पाणीपुरवठा योजना तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीची पाण्याची गरज अवलंबून आहे.
त्यामुळे तलावातील घटता पाणीसाठा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, खडकवासला कालव्यातून तलावासाठी आवर्तन सोडण्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी आणि उपलब्ध साठा यांचा ताळमेळ राखताना आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पावसाची ओढ, घटता जलसाठा आणि नव्या आवर्तनाबाबतची अनिश्चितता यामुळे व्हिक्टोरिया तलावावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तलावातील पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पाणी जपून वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्कर्ष पाटील, वरवंड शाखा अभियंता