वडगाव मावळ : गावपण टिकलंय पण रावपण हरवलंय !

वडगाव मावळ : गावपण टिकलंय पण रावपण हरवलंय !
Published on
Updated on

वडगाव मावळ(पुणे) : अलीकडच्या काळात वडगाव शहराचे नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी येथील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावचे गावपण टिकून आहे. परंतु, राजकारणामुळे गावचे रावपण मात्र हरवून गेले आहे. यामुळे गावच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असणारी विचारांची बैठकच बंद झाली असून, याचा परिणाम प्रामुख्याने शहरातील विकासावर होत असल्याचे दिसत आहे.

वडगावमध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे अधिष्ठान असून, परंपरेनुसार चालत आलेले यात्रा, कालभैरव जन्मोत्सव, काकडआरती आदी सर्व धार्मिक कार्यक्रम आजतागायत त्याच पद्धतीने साजरे होत आहेत. तसेच, शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे व्याख्यानमाला, फेस्टिव्हल सोहळा, सामुदायिक विवाह सोहळा, दिवाळी पाडवा, दहीहंडी, श्रीमंत महादजी शिंदे विजयोत्सव, नृत्य स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रम नित्यनेमाने संपन्न होत आहेत. यामुळे शहराचे नागरिकीकरण वाढत असले तरी गावचे गावपण टिकून आहे.

गटातटाच्या राजकारणाला सुरुवात

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून शहरातील राजकीय वातावरण मात्र बदलत चालले असल्याचे दिसते, जुन्या काळातील पक्षीय राजकारणाची जागा आता स्वार्थी राजकारणाने घेतली असल्याने पूर्वी होणारी विचारांची बैठकच बंद झाली आहे. एखाद्याने पुढाकार घेतला तर श्रेयवाद होतो अथवा इतरांकडून टाळाटाळ केली जाते. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील दिग्गजांनी आपआपल्या पद्धतीने राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपले वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला व गटातटाचे राजकारण सुरू झाले.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपासून गाव वंचित

या गटातटाच्या राजकारणात गुरफटले गेल्यामुळे तालुक्यातील राजकारणावर असलेली वडगावकरांची पकड काहीशी कमजोर होत चालली असून, प्रामुख्याने याचा परिणाम गावच्या विकासावर होऊ लागला आहे. याचा परिणाम म्हणूनच गावातील बाजारपेठेचे विस्तारीकरण होऊ शकले नाही. सर्व शासकीय कार्यालये व तालुक्यावर पकड असताना कोणतेही महत्त्वात्कांक्षी प्रकल्प गावात आले नाही. विचारांची बैठक कायम राहिली असती तर वडगाव शहर महत्त्वाच्या सोयीसुविधांपासून दुर्लक्षित राहिले नसते. यासाठी शहरातील सर्व पक्षातील प्रमुख मंडळींनी शहराचा विकास हाच एकमेव दृष्टिकोन ठेऊन पुन्हा आपले रावपण निर्माण करून विचारांची बैठक सुरू करणे आवश्यक आहे.

राजकारणावरील पकड झाली ढिली

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरामध्ये जुन्या काळात स्थानिक गावकारभार्‍यांची बैठक व्हायची, यातूनच गावचा विकास होत गेला. याशिवाय या गावकारभार्‍यांच्या या एकोप्यामुळे तालुक्याच्या राजकारणावर वडगावकरांची पकड होती. या माध्यमातूनच वडगावला मदन बाफना यांच्या माध्यमातून मंत्री म्हणून महाराष्ट्राचे तर बाफना यांच्यासह रुपलेखा ढोरे यांच्या माध्यमातून तीन वेळा आमदार म्हणून तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. जुन्या काळात काँग्रेस व भाजप असा टोकाचा संघर्ष असताना केवळ गावकर्‍यांच्या एकोप्यामुळे या दोन भिन्न पक्षातील दोन्ही व्यक्तींना आमदार होण्याची संधी मिळाली.

फक्त मूलभूत गरजांकडे लक्ष अन सुविधांकडे दुर्लक्ष

गेल्या काही वर्षांत गावचे शहरीकरण होत असताना लोकप्रतिनिधींनी फक्त शहरातील रस्ते, लाईट, गटर, पाणीपुरवठा अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिले. परंतु, वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या आरोग्य, शिक्षण, उद्योग व रोजगार अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्प व सुविधांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण होत गेल्या, मात्र सोयीसुविधांची उणीव राहिली.

आवश्यक सोयीसुविधा

  • सुसज्ज हॉस्पिटल व सर्व सुविधा
  • महाविद्यालयीन व तांत्रिक शिक्षण व्यवस्था
  • खेळाडूंसाठी अद्ययावत व्यवस्था
  • संपूर्ण शहरात शुद्ध पाणीपुरवठा
  • सुसज्ज भाजीमंडई
  • पार्किंग व्यवस्था
  • लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा थांबा
  • पुण्यापर्यंत पीएमपीएमएल बससेवा
  • लांब पल्ल्यांच्या एसटी बसेसचा थांबा
  • प्रशस्त सार्वजनिक सभागृह

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news