विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या महिलेस अखेर मिळाली आर्थिक भरपाई

विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या महिलेस अखेर मिळाली आर्थिक भरपाई

पिंपरी(पुणे) : तळवडे येथील विद्युत डीपीच्या उघड्या वायरीवर पाय पडून 60 टक्के भाजलेल्या सुनंदा भास्कर साळुंखे या कष्टकरी महिलेला अखेर न्याय मिळाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विजेच्या शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या या महिलेला 1 लाख 30 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. त्यामुळे त्या महिलेने समाधान व्यक्त केले. निगडी, सेक्टर क्रमांक 22 येथील सुनंदा साळुंखे यांना सोनवणे वस्ती रोड, तळवडे येथील उघड्या विद्युत प्रवाहाच्या तारेवर पाय पडून शॉक लागला. त्यात त्या मोठ्या प्रमाणावर भाजल्या गेल्या. हा प्रकार 3 सप्टेंबर 2020 ला घडला.

नागरिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तेथील उपचार परवडत नव्हते. कुटुंबातील कर्ता असणारी महिलाच या विजेच्या शॉकमुळे रुग्णालयात जीवनाशी झुंज देत होती. उपचाराच्या खर्चासाठी त्यांना आर्थिक कसरत करावी लागत होती.

हा प्रकार समजल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक कोकणे यांनी पोलिस व महावितरण कंपनीकडे तक्रार दाखल केली. मात्र, महावितरणने आपली चूक कबूल केली नाही. कोकणे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अधिकारी व प्रशासनाला त्यांची चुक लक्षात आली. जखमी महिलेस जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी सुमारे अडीच वर्ष पाठपुरावा केला. त्या महिलेला अखेर, नुकसान भरपाई मिळाली.

महावितरणच्या भोसरी कार्यालयात साळुंखे यांना धनादेश देण्यात आला. या वेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश देशमुख, सहाय्यक अभियंता ज्योत्स्ना बोरकर-पवार, जागरूक नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन शशिकांत यादव, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अशोक कोकणे, उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा, सचिव उमेश सनस, राजू डोगिवाल, मच्छिंद्र कदम उपस्थित होते. त्या महिलेच्या बँक खात्यावर 1 लाख 30 हजारांची मदत जमा झाली. आर्थिक मदतीसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल सुनंदा साळुंखे यांनी अशोक कोकणे यांचे मनापासून आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news