

जयदीप जाधव
उरुळी कांचन: अवैध रसायनयुक्त दारूचे मुख्य उत्पादन केंद्र म्हणून हवेली तालुक्यातील उरुळी कांचन हे गाव गेल्या सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसिद्ध आहे. पुण्यात विषारी दारू प्यायल्याने 18 जणांचा बळी गेल्यानंतर ती दारू उरुळी कांचनमधून आल्याचे सांगितले जात असल्याचे त्यामुळेच काही नवल वाटत नाही.
गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला हा उद्योग पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक राजकीय नेते मंडळी, आमदार-खासदार या सर्वांना माहीत असून, यातील अनेकांचे हे हप्तेरूपी उत्पन्नाचे साधन आहे. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने गेल्या पन्नास वर्षांत येथे लाखो छापे टाकले असतील. परंतु ते सर्व दिखाव्याचे जास्त होते, ‘अर्थपूर्ण’ व्यवहारामुळे या हातभट्ट्या सुरू राहण्यातच यंत्रणेला जास्त रस होता, अन्यथा आतापर्यंत या अवैध धंद्याचा समूळ नायनाट झाला असता.
पुणे शहरात या दारूविक्री व पुरवठ्याचे उरुळी कांचन हे मोठे केंद्र आहे. अनेक वर्षांपासून या अवैध धंद्यांवाल्यांसोबत स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील पोलिस प्रशासनाचे लागेबांधे आहेत. या भागात रासरोसपणे अवैध हातभट्ट्या चालविल्या जातात पुणे शहर तसेच स्थानिक गुत्यांवर या ठिकाणाहून हातभट्टी दारूपुरवठा सुरू आहे. उरुळी कांचन, पांढरस्थळ व शिंदवणे परिसरातून रासरोसपणे हजारो लिटर रसायनयुक्त हातभट्टीचा पुरवठा शहर व स्थानिक गुत्त्यांवर सुरू आहे.
विशिष्ट समाजातील ‘भाऊ’, ‘दादा’ व ‘ताई’ या अवैध हातभट्ट्या चालवतात, त्यांना मोठे अभय असल्याने अतिरिक्त दुर्गंधीयुक्त, रसायनयुक्त हातभट्टी दारूची रासरोसपणे निर्मिती होत आहे. या दारूनिर्मितीत रसायनयुक्त स्पिरीट द्रव्याचा समावेश असतो जास्त दारू कमी पैशांत तयार व्हावी यासाठी त्यात वाट्टेल ते मिसळले जाते. उरुळी कांचन व शिंदवणे परिसरात रासरोसपणे हातभट्टी दारूच्या कडई निखारा देऊन उकळल्या जात असून हजारो लिटरची दारू या ठिकाणाहून विक्रीसाठी बाहेर पडत आहे. या ठिकाणी दारूनिर्मितीसह विक्रीसाठी प्रशस्त व्यवस्था स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे.
कारवाया फक्त नावापुरत्याच!
उरुळी कांचन परिसरात या दारूभट्ट्या कमाईचे मोठे साधन असल्याने प्रशासकीय आशीर्वादाने सुरू आहेत. या ठिकाणी दारूची निर्मिती होण्यास विशिष्ट व्यवस्था निर्माण केली आहे. मोठ्या प्रमाणात ही दारू मानवी प्रकृतीस घातक असून, देखील अर्थिक उत्पन्न यंत्रणेला मिळून देत असल्याने फक्त नावापुरती कारवाई करून या धंद्यांना संरक्षण देण्याची प्रथा रूढ झाली आहे.
प्रशासनाचे धंदेवाल्यांना उघड पाठबळ
या दारूनिर्मिती करणाऱ्यांची प्रशासकीय साखळी घट्ट असल्याने दारूचे फंटे व फुगे कसल्याही प्रकारचे अडथळे न होता पुण्यात पोहचतात, या दारूधंद्याविरोधात अनेक वर्षे अतिशय जुजबी कारवाई करून मुख्य धेंडांना सोडून कामगारांना पुढे करून थातुरमातुर कारवाई दाखवून प्रशासन या धंदेवाल्यांना उघड पाठबळ देत असल्याचे उघड आहे.