Pune Poisonous Liquor Deaths: पुणे हादरले! फुगेवाडीत विषारी दारूमुळे 13 मृत्यू; अनेक कुटुंबे उद्ध्वस्त

मिथेनॉलमिश्रित गावठी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त; प्रशासनावर संतापाची लाट
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

पुणे/हडपसर: दीड वर्षापूर्वी आईचे छत्र हरपले... आणि आता विषारी दारूने वडिलांचाही जीव घेतला. एका मागोमाग आलेल्या या दुर्दैवी घटनांनी श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समधील सूर्यवंशी कुटुंब पूर्णपणे हादरून गेले आहे. दत्ता माधवराव सूर्यवंशी (वय 54) यांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Liquor
Methanol Liquor Bust: फुगेवाडी दारूकांडाचा मोठा खुलासा; 155 लिटर विषारी दारू जप्त, मिथेनॉलचा खेळ उघड

काळे कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये मागील सात वर्षांपासून सूर्यवंशी कुटुंब वास्तव्यास होते. दत्ता सूर्यवंशी हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी मुलगा आणि मुलींसाठीच आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या व्यसनाने अखेर त्यांचाही जीव घेतला. त्यांचा मुलगा दर्शन बोलताना गहिवरून गेला. ‌‘आईचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. घरची जबाबदारी बाबांवर होती. मला दोन बहिणी आहेत. एका मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. मी सर्वात लहान असून, सलूनमध्ये नोकरी करून घर चालवतो,‌’ असे सांगताना त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

Liquor
Illegal Liquor Network: फुगेवाडी दारूकांडानंतर धक्कादायक खुलासे; 40 वर्षांपासून अवैध धंद्याचे आरोप

दर्शनने सांगितले की, बुधवारी रात्री दत्ता सूर्यवंशी दारू घेऊन घरी आले होते. त्यांनी दारू प्यायल्यानंतर झोप घेतली. मात्र, गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्यांना अचानक त्रास सुरू झाला. “डोळ्यासमोर अंधारी येतेय, मला काहीच दिसत नाही,” असे ते कुटुंबीयांना सांगत होते. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिक बिघडली. उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आईनंतर वडिलांचाही आधार निघून गेल्याने दर्शन आणि त्याच्या बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भिंतीवर फोटो लावण्याची आली वेळ

छोट्याशा नोकरीवर संसार चालवणाऱ्या या कुटुंबासमोर आता भविष्यातील मोठे आव्हान उभे केले आहेत. विषारी दारूच्या वाढत्या विळख्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. एका कुटुंबासाठी हा केवळ मृत्यू नाही, तर जगण्याचा आधारच हरपल्याची वेदना आहे. आईनंतर आता वडिलांचाही फोटो भिंतीवर लावण्याची वेळ दर्शनवर आली आहे.

Liquor
Fugewadi Tragedy: फुगेवाडीवर दुःखाचा डोंगर; 13 मृत्यूंनी हसती-खेळती घरे उद्ध्वस्त

‌‘आईला लवकर बोलवा‌’

सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करणारे अरुण वामन डाडर यांना काही तासांत मृत्यू कवटाळेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. दुपारी अचानक सुरू झालेला त्रास, मुलीची धावपळ, रुग्णालयातील डॉक्टरांची धडपड आणि शेवटी आलेली मृत्यूची बातमी... या सगळ्याने डाडर कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले. विषारी दारूमुळे अरुण डाडर (वय 65) यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अरुण डाडर हे बिगारी काम करून उदरनिर्वाह करीत होते. मुलगा, सून, मुलगी आणि पत्नी असा त्यांचा परिवार. पत्नी आजारी असल्याने काही दिवसांपूर्वी त्या गावी गेल्या होत्या. घरात अरुण एकटेच होते. मुलगी काळे पडळ परिसरात राहत असल्याने त्यांच्याशी सतत संपर्कात होती. 27 मेच्या रात्री अरुण यांनी दारू प्यायली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची प्रकृती सामान्य होती. नेहमीप्रमाणे सकाळी नऊ-दहा वाजण्याच्या सुमारास ते कामावर जाण्याच्या तयारीत होते. पण, दुपारी अचानक त्यांना त्रास सुरू झाला. सतत उलट्या होत होत्या. शरीर थरथरत होते. घाबरलेल्या अरुण यांनी तातडीने मुलीला फोन केला, ‌‘मला खूप उलट्या होतायत, तब्येत बिघडलीय.‌’ वडिलांचा तो थरथरता आवाज ऐकताच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. ती तातडीने धावत आली. वडिलांची अवस्था पाहून तिने त्यांना जवळच्या साने गुरुजी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये ठेवले. उपचार सुरू झाले. पण, काही वेळातच प्रकृती अधिकच खालावली. कष्ट करून संसार चालवणारा माणूस एका विषारी दारूच्या घोटाने कायमचा निघून गेला.

Liquor
Toxic Liquor Tragedy: ईदपूर्वीच दोन घरांवर काळाचा घाला; विषारी दारूने हिरावले दोन जिवलग मित्र

बहिणीसमोरच भावाचा तडफडून अंत

‌‘रात्री दारू पिऊन घरी आला, पण चालत-बोलत होता... सकाळी उठला आणि अचानक उलट्या सुरू झाल्या. तोंडाला फेस येऊ लागला... आम्ही काही समजून घेण्याआधीच माझा भाऊ गेला...‌’ हा प्रसंग सांगताना कल्पना जाधव यांचा व्यवस्थेविषयीचा राग व्यक्त होत होता. पांढरे मळा, हडपसर येथे घडलेला यशवंत रघुनाथ पवार (62) यांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला. यशवंत पवार हे पूर्वी पीएमपीएलमध्ये नोकरीला होते. मात्र, दारूच्या व्यसनामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. काही दिवसांपासून ते बहीण कल्पना जाधव यांच्याकडे राहत होते. पत्नी, दोन मुले आणि नातवंडांचा परिवार असलेल्या पवार यांचे आयुष्य व्यसनाच्या विळख्यात अडकले; पण कुटुंबाला कधी वाटले नव्हते की, एका रात्रीत सर्व काही संपेल. दि. 26 मेच्या रात्री आठच्या सुमारास पवार दारू पिऊन घरी आले. ‌‘तो रोजसारखाच आला होता. काही वेगळं वाटलं नाही. पण सकाळी उठल्यावर अचानक त्याला त्रास सुरू झाला,‌’ असे बहिणीने सांगितले. काही वेळातच उलट्या, तोंडाला फेस आणि तडफड सुरू झाली. कुटुंबीय घाबरले, मदतीसाठी धावपळ झाली; पण काही क्षणांतच यशवंत पवार यांचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या संतापात भर पडली, ती अधिकृत कारणामुळे. पोलिसांनी ‌‘हृदयविकाराचा झटका‌’ हे कारण सांगितल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ‌‘जर हृदयविकार होता, तर तोंडाला फेस आणि उलट्या का झाल्या? आम्हाला सत्य का सांगितलं नाही?‌’ असा सवाल कुटुंबीय करत आहेत.

Liquor
Toxic Liquor Deaths: फुगेवाडीत विषारी दारूचा कहर! 13 जणांचा मृत्यू; अनेकांची मृत्यूशी झुंज

गावठी दारूने हिरावला कुटुंबाचा आधार

‌‘पाठ खूप दुखतेय... डोळ्यांनी दिसत नाहीये...‌’ असे म्हणत पत्नीसमोर वेदनेने तडफडणारा विजय शर्मा काही तासांतच कायमचा निघून जाईल, याची कल्पनाही त्यांच्या कुटुंबाला नव्हती. हडपसरमधील पांढरेमळा परिसरात राहणाऱ्या विजय शर्मा (वय 46) यांचा गावठी दारू पिल्यानंतर मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि दोन मुलगे, असा परिवार असून, कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने घर उघड्यावर पडले आहे.

विजय शर्मा हे मूळचे बिहारचे. काही वर्षांपूर्वी आईसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी पुण्याची वाट धरली होती. हातावर पोट असलेल्या विजय यांनी बिगारी काम करीत संसार उभा केला. कष्ट करून चार मुलांना वाढविले. मात्र, दारूच्या व्यसनाने अखेर त्यांचाच जीव घेतला. मात्र, पोलिसांच्या रेकॉर्डला यांचा मृत्यू दारूमुळे झाला, अशी कोणतीही नोंद नाही. पोलिसांच्या मृतांच्या यादीत विजय शर्मा यांचे नावच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नी बिजली शर्मा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास विजय यांनी पांढरेमळा परिसरातील गुत्त्‌‍यावरून गावठी दारूचा फुगा आणला होता. दारू पिऊन ते झोपले. सकाळी उठल्यानंतर त्यांना अचानक पाठदुखी सुरू झाली. “डोळ्यांनी काही दिसत नाही,” असे ते पत्नीला म्हणाले. पत्नीने पाठ दाबून दिली; मात्र त्रास वाढत गेल्याने त्यांना तातडीने जवळच्या साने गुरुजी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील विधीसाठी शर्मा कुटुंबीय शनिवारी बिहारला रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news