Illegal Liquor Network: फुगेवाडी दारूकांडानंतर धक्कादायक खुलासे; 40 वर्षांपासून अवैध धंद्याचे आरोप

नागरिकांचे गंभीर दावे; दारू अड्ड्याविरोधात भीती, दहशत आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पिंपरी: फुगेवाडीतील विषारी दारूकांडानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृत्यूंची मालिका सुरू असतानाच दैनिक ‌‘पुढारी‌’च्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता अनेक नागरिकांनी कर्नेलसिंह विरका कुटुंबीयांच्या कथित अवैध दारू व्यवसायाबाबत धक्कादायक दावे केले.

या वेळी एका स्थानिक तरुणाने आपला अनुभव सांगताना थेट दापोडी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर, अनेक नागरिकांनी विरका कुटुंबीयांची परिसरात मोठी दहशत असल्याचे सांगितले.

आमच्या परिसरात हा दारूचा अड्डा आजचा नाही. आम्ही लहानपणापासून तो पाहतोय. जवळपास 40 वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. दिवसरात्र दारूडे, भांडणे, शिवीगाळ, महिलांची गैरसोय, तरुण मुलांवर वाईट परिणाम... हे सगळं आम्ही सहन करत आलो. अनेकदा तक्रारीही केल्या; पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने प्रकरण मिटवले जायचे, असे त्या तरुणाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

तरुणाने पुढे सांगितले की, परिसरातील अनेक नागरिकांना या अड्ड्याचा त्रास होत होता. मात्र, विरका कुटुंबीयांबाबत उघडपणे बोलण्याची हिंमत कोणीच करत नव्हते. त्यांची परिसरात दहशत होती. त्यांच्याविरोधात आवाज उठवला तर वाद होणार, धमक्या मिळणार किंवा विनाकारण त्रास होणार, अशी भीती अनेकांना वाटत होती. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी गप्प राहणेच पसंत केले होते. काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही नंतर माघार घ्यावी लागली होती.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तरुणाचा विरका कुटुंबीयांशी वाद झाला होता. दारू अड्ड्यामुळे परिसरातील वातावरण बिघडत असल्याच्या तसेच घरगुती कारणावरून त्याने विरोध केला. त्यानंतर वाद वाढला आणि प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news