

सांगवी: दोन दिवसांपासून फुगेवाडीच्या मातीलाही पाझर फुटला आहे. एका दुर्दैवी घटनेने 13 जीवांचा बळी घेतला आहे आणि फुगेवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 13 हसती- खेळती घरे एका क्षणात उद्ध्वस्त झाली असून, संपूर्ण परिसरात स्मशानशांतता पसरली आहे.
कुटुंबांचा आर्त टाहो आणि निराधार स्वप्ने
आज 13 कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे. कोणाचा बाप गेला, कोणाचा भाऊ गेला, तर कोणाचा काका गेला. ज्यांच्या कष्टावर घर चालत होते, ते कर्ते पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांची पत्नी आणि लहान मुले आता पूर्णपणे निराधार झाली आहेत.
आता आमचं काय होणार? हा प्रश्न विचारणाऱ्या लहानग्यांचा आक्रोश आणि बायकांचा हंबरडा पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. फुगेवाडीकर आज इतके अगतिक झाले आहेत की, त्यांना कोणाचे सांत्वन करावे आणि कोणाच्या दुःखात सहभागी व्हावे, हेच सुचेनासे झाले आहे.
प्रशासनाला जाब; मृत्यूचा धंदा कोणाच्या आशीर्वादाने?
आज संतप्त फुगेवाडीकरांनी लोकप्रतिनिधींना घेराव घालून एकच सवाल केला. आमच्या वस्तीच्या मध्यभागी ही दारूची दुकाने गेली अनेक वर्षे सुरू आहेत. अनेकदा तक्रारी करूनही फक्त थातूर-मातूर कारवाई केली जाते. आज 13 संसारांची राखरांगोळी झाली आहे, याला जबाबदार कोण? या दुकानांनी केवळ माणसे मारली नाहीत, तर फुगेवाडीचा आधारच हिरावून घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या या विषारी धंद्याला राजकीय अभय कोणाचे आहे? असा जळजळीत सवाल आज फुगेवाडीकर प्रशासनाला करत आहेत.
फुगेवाडी सुन्न; न्याय मिळेल का?
आज संपूर्ण फुगेवाडी परिसरात चुली पेटल्या नाहीत. केवळ अश्रू आणि आक्रोश उरला आहे. ज्या विषारी दारूने 13 जणांचे आयुष्य हिरावले, त्या साखळीला मोडीत काढल्याशिवाय या आत्म्यांना खरी शांती मिळणार नाही. फुगेवाडीच्या या दुःखाला आता केवळ अश्रूंचे उत्तर पुरेसे नाही, तर या कुटुंबांना न्याय मिळणे ही काळाची गरज आहे. प्रशासन आता तरी जागे होणार का, की आणखी काही संसार बळी जाणार? हे प्रश्न आज प्रत्येक फुगेवाडीकराच्या मनात घर करून बसला आहे.