

उरुळी कांचन: माहेरवरुन चारचाकी वाहनासाठी पैशांचा तगादा तसेच गर्भपात करण्यासाठी छळ केल्याने विवाहीतेने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे घडली. या प्रकरणी विवाहितेच्या सासु सोरतापवाडीच्या सरपंच सुनिता चौधरी यांच्यासह पती व दीर यांच्याविरोधात उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुळशीच्या हगवणे प्रकरणानंतर घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
दिप्ती रोहन चौधरी ( रा. सोरतापवाडी कडवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेने नाव आहे. या प्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर (वय ५०, रा. आकेशिया गार्डन 4, बंगला नं.3 मगरपट्टा सिटी, हडपसर पुणे ) यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात आत्महत्या, सासुरवासाचा छळ अशा गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती यांचा विवाह रोहन चौधरी यांच्यासोबत झाला आहे. या विवाहीतेला वेळोवेळी कुटूंबातील पती, सासरे, सासू , दीर यांच्याकडून पैशांची मागणी होत होती. पती रोहन याला चारचाकी वाहनासाठी या कुटूंबातून पैशांची मागणी होत होती. तिचा गर्भपात करुन वारंवार टोचून बोलून कुटूंबियांच्या मंडळींनी दिप्ती यांचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळूनच दिप्ती यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी (दि. २४ ) सायंकाळी ७.३० उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सोरतापवाडीच्या सरपंच सासु सुनिता कारभारी चौधरी, पती रोहन कारभारी चौधरी, सासरे कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी (सर्व रा. कडवस्ती सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्या विरोधात उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणाने परिसर हादरुन गेला असून मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात विवाहीतेचा बळी गेला असताना या घटनेमुळे प्रचंड संताप पसरला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.