

पुणे: मुळा-मुठा नदी काठ सुधार योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या संगमवाडी ते बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंतच्या नदीकाठ विकास कामांपैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत बंडगार्डन येथील गणेश घाट परिसरातील विकसित ट्रॅकचा वापर यापूर्वीच सुरू झाला असून, आता संगमवाडी येथील नदीकाठालगतचा जॉगिंग ट्रॅकही नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे.
एकाच वेळी 2 हजार नागरिक बसण्याची व्यवस्था
संगमवाडी येथे मुळा व मुठा नद्यांचा संगम होणाऱ्या ठिकाणी नदीपात्राच्या दिशेने उतरत जाणाऱ्या पायऱ्या तयार केल्या असून, या घाटावर एकावेळी सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. घाटाच्या वरच्या भागात लाल मातीचा चालण्याचा ट्रॅक तसेच त्यालगत सायकल ट्रॅकसारखी रचना केली आहे. परिसरात वृक्षारोपण केले असून, नदीपात्रात पिचिंग करून त्यावरही फुलझाडांची लागवड केली आहे. त्यामुळे या भागाचे संपूर्ण स्वरूप बदलले आहे. नदीकाठावर तयार केलेल्या या ट्रॅकमुळे विशेषतः संगमवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सायंकाळी फिरण्यासाठी एक सुरक्षित व शांत जागा उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण
सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक येथे फिरण्यासाठी येत आहेत. विशेषतः संगमवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय आहे. वर्दळीच्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या या जॉगिंग ट्रॅकमुळे नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण, स्वच्छ हवा आणि शांतता अनुभवता येत आहे. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच नदीकाठ परिसरात सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी वाहनांच्या गतीवर नियंत्रणाकरिता गतीरोधक किंवा पादचारी अंडरपासची सुविधा निर्माण करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महापालिकेकडून शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीकाठचा सर्वांगीण विकास करण्याचे काम सुरू असून, हे काम एकूण 11 टप्प्यांत होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात संगमवाडी येथील नदीवरील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंत सुमारे 3.7 किलोमीटर लांबीचा नदीकाठ विकसित करण्यात येत आहे. संगमवाडीतील स्मशानभूमीजवळील काही जागा लष्कराकडून ताब्यात येण्यास विलंब झाल्यामुळे कामास थोडा अडथळा आला होता. मात्र, उर्वरित भागातील कामे पूर्ण केली आहेत. संगमवाडी येथील दीड किलोमीटरचा पट्टा 26 जानेवारीपासून नगरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात बंडगार्डन येथील गणेश घाट परिसरातून केली होती. साधारण वर्षभरात गणेश घाट परिसरातील 700 मीटर लांबीचे काम पूर्ण झाले. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकसह नागरिकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. हाच विकास नमुना संगमवाडी येथे पाटील इस्टेटच्या पलीकडील तीरापर्यंत अंमलात आणला आहे.
नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत संगमवाडी ते बंडगार्डनदरम्यानचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. संगमवाडी येथील संगम घाटाचे कामही किरकोळ बाबी वगळता पूर्ण झाले असून, घाटावर जाणाऱ्या प्रवेश मार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच लॉर्ड वेलस्ली पुलाजवळील घाटापासून बंडगार्डन पुलापर्यंतचे कामही पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल. नागरिकांनी या ट्रॅकचा वापर सुरू केला असून, लवकरच येथे पिकनिक स्पॉटसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा सुरू करण्यात येतील.
प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.