

पुणे: शहरात वेळेत कचरा न उचलला गेल्याने अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. ही समस्या दूर करून कचरा वेळेत उचलला जावा आणि त्यावर तातडीने प्रक्रिया व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने कचरा संकलनासाठी तब्बल 292 कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. या निविदांतर्गत पुढील पाच वर्षांसाठी 364 वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, त्यामुळे दररोज कचरा संकलनाचे काम सुमारे तीन तास आधी पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुणे शहरात दररोज साधारण 2200 ते 2300 टन कचरा निर्माण होतो. सध्या स्वच्छ संस्थेचे कचरावेचक घरोघरी फिरून कचरा गोळा करतात. हा कचरा फिडर पॉइंटवर जमा केल्यानंतर महापालिकेच्या वाहनांमधून हस्तांतरण केंद्रावर नेण्यात येतो. तेथून मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये कचरा भरून प्रक्रिया प्रकल्पांवर पाठविला जातो. कागदावर प्रभावी वाटणारी ही यंत्रणा प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणींमुळे अपुरी ठरत असून, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहरात अस्वच्छतेची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून थेट वाहनांद्वारे कचरा संकलन करण्याची योजना आखली होती. विमाननगर परिसरात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. मात्र, या निर्णयाला स्वच्छ संस्थेने विरोध केला होता. नोव्हेंबर महिन्यात स्वच्छ संस्थेने महापालिकेच्या कचरा संकलन यंत्रणेतील त्रुटी आकडेवारीसह जाहीर केल्या होत्या. या आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत शहरातील 1,076 फिडर पॉइंटपैकी 32 टक्के ठिकाणी कचरा उचलणाऱ्या गाड्या उशिरा पोहोचल्या, तर सहा टक्के ठिकाणी गाड्या आल्याच नाहीत. गाड्या उशिरा आल्याने शहरातील 400 हून अधिक ठिकाणी कचरा रस्त्यावर साचून राहत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कचरा वेचक महिलांचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्यांना वाहनांच्या प्रतीक्षेत बसावे लागते, असेही स्वच्छ संस्थेने स्पष्ट केले होते.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाहता कोथरूड-बावधन भागात 47 टक्के, वारजे-कर्वेनगरमध्ये 41 टक्के, कोंढवा-येवलेवाडीमध्ये 42 टक्के, औंध-बाणेरमध्ये 38 टक्के, तर नगर रस्ता-वडगाव शेरी भागात 26 टक्के वाहनांची उशिराने येण्याची नोंद असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर कचरा साठून राहत असल्याचे स्पष्ट झाले होते. या परिस्थितीनंतर महापालिका प्रशासनाने घनकचरा विभाग, मोटार वाहन विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
शहर स्वच्छ करण्यासाठी घंटागाड्या, कॉम्पॅक्टर आणि बिन-लिफ्ट (छोटे कॉम्पॅक्टर) ही वाहने भाड्याने घेण्यासाठी घनकचरा विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार 340 घंटागाड्या, 12 कॉम्पॅक्टर आणि 11 बिन-लिफ्ट भाड्याने घेण्यासाठी प्रशासनाने 284.31 कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. प्रत्यक्षात वाढीव दराने 292.83 कोटी रुपयांची निविदा प्राप्त झाली. यामध्ये कोणार्क इन्फास्ट्रक्चर कंपनीला 60 टक्के, तर पी. गोपीनाथ रेड्डी प्रोप्रायटरी या कंपनीला 40 टक्के काम देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
या निविदेमुळे काय होऊ शकते?
दररोज सुमारे 200 टन अतिरिक्त कचरा उचलला जाणार
सकाळी 7 ते दुपारी 4 ऐवजी दुपारी 1 पर्यंत शहरातील कचरा संकलन पूर्ण
कचरा संकलनाची गती वाढून काम तीन तास आधी संपणार
कचरा वाहतूक वाहनांच्या पार्किंगची जबाबदारी ठेकेदाराची
कार्यादेशानंतर तीन महिन्यांत सर्व वाहने उपलब्ध करणे बंधनकारक
शहरातील कचरा संकलन अधिक वेगाने व्हावे, यासाठी पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वाहने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कचरा लवकर उचलला गेल्यास शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल.
अविनाश सकपाळ, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग