

पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शाळेच्या बसच्या धडकेत पाच वर्षांचा बालकाचा मृत्यू झाला असून, त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाला अटक केली आहे. तर मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, मुख्याध्यापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. अपघातात साईनाथची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८, रा. गणराज हाईट्स, सावली होम सोसायटीजवळ, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) गंभीर जखमी झाल्या आहेत. रेखा यांनी याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी बसचालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक केली आहे. तर मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापिका डाॅ. आरती जाधव, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या मालक मनीषा संजय मोडक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ उरुळी देवाची परिसरातील एका शाळेत शिशूगटात होता. मंगळवारी (दि.२ डिसेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास त्याची आई रेखा या त्याला शाळेत सोडण्यासाठी धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसने रिव्हर्स घेत असताना रेखा आणि साईनाथ यांना धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, साईनाथच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. तर रेखा यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर साईनाथ आणि रेखा यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच साईनाथ याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांच्या आक्रोशामुळे परिसरात शोककळा पसरली होती. फुरसुंगी भागातील एका शाळेची ही बस असल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी शाळेचे प्रशासन, संस्थाचालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अपघात प्रकरणी स्कूलबसच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे बस चालविण्याचा वाहन परवाना नसल्याचे समोर आले आहे. शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापिका आणि स्कूलबस मालक यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल मोर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फुरसुंगी पोलिस ठाणे