उरुळी देवाची, फुरसुंगी कोणत्या पालिकेत?; रहिवाशांमध्ये संभ्रम

उरुळी देवाची, फुरसुंगी कोणत्या पालिकेत?; रहिवाशांमध्ये संभ्रम

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे महानगरपालिकेतून वगळून या गावांची मिळून एक स्वतंत्र नगरपालिका झाल्याची घोषणा मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु, याबाबत अद्याप अंतिम अधिसूचना आलेली नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प, फक्त महापालिकेची करआकारणी सुरू असल्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन्ही गावांत गेल्या दोन वर्षांत रस्ता, ड्रेनेज, डागडुजी, पथदिवे, बागा, जलवाहिनी, भाजीमंडई, नाट्यगृहे, क्रीडांगणे, स्वच्छतागृहे अशी कोणतीच विकासकामे झालेली नाहीत. 72 कोटींच्या पाणी योजनेपासूनही बहुतांश भाग वंचित आहेत. पुणे महापालिकेचे पाणी टँकरही वेळेत व नियमित संख्येने मिळत नाहीत. कचर्‍याचाही प्रश्न आहे. रस्त्यावरील खड्डेही बुजविले जात नाहीत. अनेक ठिकाणी पथदिवेही नाहीत, कुठल्याच आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा नाहीत.

सुविधांच्या नावाने ठणठणाट

पुणे महापालिकेकडून कर गोळा करण्याचे कामअव्याहतपणे सुरू आहे. नवीन डीपी नाही, वीन शासकीय दवाखाना नाही, नवीन सरकारी शाळा नाही, गावातील या विविध विकासकामे आणि सुखसोई व सुविधांसाठी कित्येकवेळा गाव पुणे मनपात असताना पत्रव्यवहार झाले. परंतु, पुणे मनपाने यातील कोणतेही ठोस काम केलेले नाही. ही दोन्ही गावे महापालिकेतच राहणार की नवीन नगरपालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार, याबाबत गावकर्‍यांमध्ये कमालीची संदिग्धता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका करण्याची घोषणा करूनही याबाबतची अंतिम अधिसूचना निघत नाही. या लालफितीच्या कारभारामुळे या दोन्ही गावांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ अधिसूचना काढावी.

– पिंटू हरपळे, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी

या दोन गावांच्या नगरपालिकेचा अंतिम जीआर निघत नाही तोवर या गावांची विकासकामे तशीच सुरू ठेवावीत, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिला आहे. तरीदेखील कुठलेच काम झालेले दिसत नाही. कामही नाही आणि बजेटही नाही म्हणून सांगायचे, हा दुटप्पीपणा आहे.

– संतोष भाडळे, माजी पंचायत समिती सदस्य, हवेली

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news