Pune : इंदापुरात अतिक्रमणांवर कारवाई

Pune : इंदापुरात अतिक्रमणांवर कारवाई

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर शहरातील जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाबा चौक ते इंदापूर महाविद्यालय यादरम्यान दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांवर इंदापूर नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक कारवाई करण्यात आली.
इंदापूर शहरातून जाणार्‍या जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, बसस्थानक, पंचायत समिती कार्यालय, न्यायालय यांच्यासह बाजारपेठ असल्याने या भागात सतत वर्दळ असते. त्यातच या मार्गाच्या दुतर्फा पदपथावर पथविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना जीव धोक्यात घालून महामार्गावरून मार्गक्रमण करावे लागते.

यामुळे बर्‍याच वेळा अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात. इंदापूर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने आवश्यक साहित्यासह फौजफाटा घेऊन बुधवारी (दि.7) या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही भागात पथविक्रेते व प्रशासन यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून सुजय मखरे, योगेश सरवदे, अशोक अडसूळ, दत्तात्रय ढावरे यांच्या पथकाने तसेच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पोलिस पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

'कारवाई करताना दुजाभाव करू नये'
या कारवाईत फक्त पदपथ मोकळा करून गरिबांच्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढदिवस तसेच व्यवसायाच्या जाहिरातींचे फ्लेक्स झळकत असतात. हे फ्लेक्स अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. यावरही नगरपरिषदेकडून कारवाई करताना ठराविकच फ्लेक्स हटवले जातात. त्यामुळे कारवाईत असा दुजाभाव केला जाऊ नये, अशी मागणी इंदापूरवासीयांमधून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news