पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून येत्या 10 फेब्रुवारीला विद्यापीठाचा 75 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने दिल्या जाणार्या जीवनसाधना गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील, माजी राज्यपाल राम नाईक, अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह नऊ जणांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठातर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. विद्यापीठातर्फे राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी भारताच्या माजी राष्ट्रपती तसेच विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी प्रतिभाताई देवीसिंह पाटील तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, कायदा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी अॅड. उज्ज्वल निकम, उद्योजकता व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मिलिंद कांबळे, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी कृषिरत्न अनिल घमाजी मेहेर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी कृष्णकुमार गोयल, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी प्राचार्य ठकाजी नारायण कानवडे आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हेमंत हरिभाऊ धात्रक यांची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वर्धापन दिन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू प्रा.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. विजय खरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत. 10 तारखेला हा कार्यक्रम दोन भागांत होणार असून 2 ते 4 दरम्यान विद्यापीठातील कर्मचार्यांना परिसंस्थांना (महाविद्यालय) आणि युवा गौरव पुरस्कारार्थींना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. तर संध्याकाळी 4. 45 वाजता आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मान्यवरांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हेही वाचा