मोहोळच्या खुनातील आरोपींना मानकरने सिम कार्डसोबत कॅशच दिल्याचे निष्पन्न | पुढारी

मोहोळच्या खुनातील आरोपींना मानकरने सिम कार्डसोबत कॅशच दिल्याचे निष्पन्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील आरोपींना खेड शिवापूर परिसरात अभिजित अरुण मानकर याने सिम कार्ड आणि कॅश आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्ह्याच्या कटाच्या अनुषंगाने मानकर याचे आरोपींसमवेतचे संभाषण समोर आले असून, त्याच्या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवायचे आहेत, त्यामुळे मानकरला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश (मोक्का) व्ही. आर. कचरे यांनी दि. 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शरद मोहोळचा खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणार्‍या आणि आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात असणाऱ्या अभिजित अरुण मानकर (31, रा. दत्तवाडी) याला गुन्हे शाखेने अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आत्तापर्यंत शरद मोहोळच्या खून प्रकरणात 16 आरोपींना अटक करण्यात आली असून, मानकर हा 17 वा आरोपी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे क्लोन करण्यात आले असून, त्यात 19 हजार 827 ऑडिओ क्लिप, रेकॉर्डिंग मिळवून आले आहे. यातील 10 हजार क्लिपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. त्यात मानकर याचेही आरोपींबरोबरचे संभाषण समोर आले आहे. मानकरच्या आवाजाचे नमुने लॅबला पाठवायचे आहेत.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढची साखळी समोर येण्याची शक्यता आहे, असे सुनील तांबे यांनी न्यायालयाला सांगितले. विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला की आरोपीचा गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न झाला आहे. त्याच्या आवाजाची चाचणी होणे बाकी आहे. या अनुषंगाने आरोपीची कस्टडी आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला आठवडाभराची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

Back to top button