पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आळंदी रस्त्यावरील चर्होली फाटा बीआरटीएस मार्गावर पदपथ व रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. तर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. चक्क बीआरटीएसच्या लोखंडी कठड्यांना फ्लेक्स लावले जातात. रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे लहान-मोठे अपघात सातत्याने होत आहेत. तरीही महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेने शहरभरात प्रशस्त रस्ते विकसित केले आहेत. चर्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी, मोशी, बोर्हाडेवाडी या परिसरात महापालिकेने प्रशस्त रस्ते तयार केले आहेत. तसेच, बीआरटीएस रस्ता निर्माण केला आहे. या रस्त्यांवर तसेच, पदपथावर अतिक्रमण झाले आहे. बेशिस्तपणे वाहने लावली जातात. दुकाने व हॉटेलमध्ये आलेले ग्राहक रस्त्यांवरच वाहने लावतात. विक्रेते व दुकानदारांनी आपला माल व साहित्य पदपथावर मांडतात. बीआरटीएसच्या लोखंडी कठड्यावर थेट विनापरवाना फ्लेक्स लावण्यात येतात. त्यामुळे हे प्रशस्त रस्ते अरुंद झाले आहेत. या रस्त्यावर सकाळी व सायंकाळच्या वेळेत प्रचंड वाहतूक वर्दळ असते.
पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंमुळे वाहतूक संथ होऊन वारंवार कोंडी होत आहे. याच प्रकारामुळे गेल्या आठवड्यात वेगातील कार चालकाने रस्ता ओलांडत असताना एका सात वर्षांच्या बालकास फरफटत नेले. त्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकाराचे अपघात या परिसरात नेहमी होत आहेत. असे असतानाही महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांकडून नियमितपणे कठोर कारवाई होत नसल्याने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा