Pune News : पुण्यात अनधिकृत आठवडे बाजारांचा सुळसुळाट; 100 पैकी सहाच बाजार अधिकृत!

Pune News : पुण्यात अनधिकृत आठवडे बाजारांचा सुळसुळाट; 100 पैकी सहाच बाजार अधिकृत!
Published on
Updated on

पुणे : शहरात अनधिकृत शेतकरी आठवडे बाजारांचा सुळसुळाट असून, माजी नगरसेवक आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने रिकाम्या जागांवर ठिकठिकाणी शंभरावर बाजार भरत आहेत. विशेष म्हणजे यातील केवळ सहाच बाजार अधिकृत असून, उर्वरित अनधिकृतपणे भरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आठवडे बाजारांचा सुळसुळाट रोखण्यासाठी महापालिका लवकरच स्वतंत्र नियमावली लागू करणार आहे. शेतकर्‍यांच्या शेतमाल उपलब्ध व्हावा आणि शहरातील नागरिकांनाही रास्त दरात पालेभाज्या उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारने 2015 मध्ये 'शेतकरी आठवडे बाजार' ही संकल्पना पुढे आणली.

यासाठी पणन मंडळाची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. पणन मंडळाने परवानगी दिलेल्या आठवडे बाजारांसाठी राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा उपलब्ध करून द्यावी, असा अध्यादेश राज्य सरकारने काढला होता. या बाजारामध्ये विविध वस्तू व पालेभाज्या विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना 10 बाय 10 फूट जागा दिली जाते. यासाठी 5 तासांसाठी 50 रुपये भुईभाडे आकारण्याचे निश्चित केले आहे. सुरुवातीला या बाजारात शेतकरी सहभाग घेत.

मात्र, जसजशी बाजाराची संख्या वाढत गेली, तसतसे यामध्ये दैनंदिन स्वरूपात फळभाज्या व किराणा मालाच्या व्यापार्‍यांनी घुसखोरी केली. परिणामी, जास्त दराने वस्तूंची व भाजीपाल्याची विक्री होऊ लागली. यामुळे मूळ उद्दिष्टांनाच हरताळ फासला जाऊ लागला. दुसरीकडे सहभागी होणार्‍या विक्रेत्यांकडून अवाच्या सवा भुईभाडे वसूल केले जाते. ग्राहकांना जास्त किमतीमध्ये भाजी व वस्तू विकल्या जातात.

बाजारासाठी रॅकेट

शेतकरी आठवडे बाजारासंदर्भात शहरात काही लोकांचे रॅकेट कार्यान्वित आहे. हे लोक सर्वप्रथम जागांची पाहणी करतात. त्यानंतर ते यातून मिळणार्‍या पैशाची कल्पना देऊन शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना स्थानिक नेत्यांच्या गळी उतरवतात. बाजारासाठी एका एजंटची नियुक्ती केली जाते. हाच एजंट बाजारात कोणाला बसू द्यायचे, त्यांच्याकडून भुईभाडे वसूल करायचे, नेहमीचा एखादा व्यापारी न आल्यास त्याला फोन करून बोलावणे, आदी कामे करतो. बाजाराच्या ठिकाणी स्थानिक नेत्याच्या संकल्पनेतून आठवडे बाजार, असे फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्याचे धाडस केले जात नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

बाजारांना परवानगीच नाही

बहुसंख्य आठवडे बाजार कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेने बुधवारी शहरातील आठवडे बाजार चालवणार्‍या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी 37 संचालकांनी हजेरी लावली. या वेळी महापालिका अधिकार्‍यांनी परवानगी कोणी कोणी घेतली आहे, असे विचारल्यानंतर केवळ 6 बाजारांना परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी आठवडे बाजारांसंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्याने या बाजारांसाठी महापालिका लवकरच नवीन नियमावली तयार करणार आहे. त्यानुसार आठवडे बाजारात मार्केटमधून माल आणून विकता येणार नाही. शेतातील मालच विकणे बंधनकारक राहील. आठवडे बाजारात शेतकर्‍यांना मज्जाव केल्यास संबंधित बाजार बंद करण्यात येईल.

– माधव जगताप, उपायुक्त, महापालिका.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news