पुणे : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम सुरू असलेल्या नियोजित गृहप्रकल्पाच्या (इमारतीच्या) तिसर्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. इमरान नईम खान (वय 36, रा. गाडीतळ, येरवडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी ठेकेदार इंद्रजीत रॉय आणि इतरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार रामदास यशवंत होले यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 9 मार्च रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली आहे. श्रीनाथनगर घोरपडीमध्ये एका नियोजित गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. इमरान खान हा तेथे प्लास्टरचे काम करत होता.
जेवणाची सुट्टी झाल्याने तो इमारतीवरून खाली उतरत होता. त्या वेळी तिसर्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, निर्धारित नियमानुसार कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्यात आली नव्हती. तसेच, कामगारांना सेफ्टीबेल्ट व डोक्याला हेल्मेट न देता त्यांच्याकडून धोकादायकरीत्या काम करून घेतले जात होते. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या बाबतीत हयगय आणि निष्काळजीपणाचे कृत्य केल्याने खान याचा तिसर्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुतार करत आहेत.
हेही वाचा