महापालिकेत निविदांचा धो-धो पाऊस : स्थायीची आज बैठक | पुढारी

महापालिकेत निविदांचा धो-धो पाऊस : स्थायीची आज बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत सध्या विविध कामांच्या निविदांचा पाऊस पडत आहे. यासोबतच निधीचे वर्गीकरण करण्याचाही झपाटा सुरू असून, उद्या (शुक्रवारी) होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत 144 कोटींच्या विविध 70 कामांच्या निविदा व चार कोटी 35 लाख निधीच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. ऐनवेळी दाखल होणार्‍या प्रस्तावांमुळे ही संख्या वाढू शकते.  लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. 15 मार्चनंतर केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू शकते. याशिवाय मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात समावेश असलेल्या कामांसाठी तरतूद केलेला निधी उपयोगात आणणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत नवीन कामांच्या निविदा काढण्याची व निधीचे वर्गीकरण करण्याची लगीनघाई सुरू आहे.  महापालिकाच्या स्थायी समितीची बैठक उद्या (शुक्रवार) सकाळी होण्याची शक्यता असून या बैठकीमध्ये प्रशासनाने विविध कामांच्या 144 कोटीच्या 70 निविदा व चार कोटी 35 लाख निधीच्या वर्गीकरणाचे पाच प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बांधणे आणि मुंकूदराव आंबेडकर चौक येथे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी मे. एस. एस.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांची 95 कोटी 21 लाख रूपयांची निविदा, पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी 93 लाख 35 हजारांची निविदा, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ येथील रस्ते डांबरीकरण, विठ्ठलराव तुपे क्रिडा संकुलातील जलतरण तलाव.

बॅडमिटन हॉल येथे विविध स्थापत्य विषयक कामे, चर्च ते वांजळे चौकापर्यंतचा डीपी रस्ता विकसित करणे, कै. रामचंद्र बनकर क्रीडा संकुलामध्ये विविध स्थापत्य विषयक कामे करणे, पुणे कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघात डायसप्लॉट, भवानी पेठ, लुल्लानगर परिसरात वॉटर लाईन टाकणे आणि दुरुस्तीविषयक कामे, हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत प्रभागामध्ये टॅकरने पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी 99 लाख 99 हजारांची निविदा, हडपसर साडेसतरानळी साधना बॅक ते स. नं. 176, 177 ,241, 242 येथील नाल्यावरील अस्तित्वातील पाईप कल्व्हर्टच्या ठिकाणी आर. सी. सी कल्व्हर्ठ पुलाचे काम करणे, 1 कोटी 71 लाख 55 हजाराची निविदा, शंकरशेठ रस्ता ते गुरुनानकनगर फुटपाथ आणि सायकल ट्रक विकसित करणे आदी कामांचा समावेश आहे.

‘दाखल’ मान्यतेसाठी अनेक प्रस्ताव

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किंवा तातडीचा विषय असेल, तर तो स्थायी समितीच्या बैठकीला आयत्यावेळी दाखल करून मान्य करण्यात येतो. मात्र, या नियमाचा आता दुरुपयोग केला जात आहे. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर महत्त्वाचे विषय आणले तर त्याची चर्चा होते. पण आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे स्थायी समितीच्या शुक्रवारी होणार्‍या बैठकीत अनेक विषय अशा ‘दाखल’ मान्यतेसाठी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button