कार्ला : अन्नातून विषबाधा झाल्याने 149 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जेवरेवाडी येथे (दि. 28 ते 30) जानेवारीदरम्यान घडली. या घटनेत मेंढपाळाचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने 125 शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट, ता. पारनेर, जि. नगर) हे आपल्या बकर्यांचा वाडा घेऊन मावळ तालुक्यातील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वेहेरगाव, वरसोली या ठिकाणी शेतात मेंढ्या फिरवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. रविवारी वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात त्यांच्या बकर्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने रविवारी (दि. 28) मध्यरात्रीनंतर सोमवारी सकाळपर्यंत जवळपास 146 बकर्यांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत हा आकडा 149 पर्यंत गेला.
शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने मेंढपाळांनी तात्काळ गावातील नागरिकांना कळवले. नागरिकांनी मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. वैद्यकीय पथकाने दोन दिवसांपासून बकर्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पशुधन दगावल्याने धनगर बंधूंवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आर्थिक नुकसान झाले आहे.
रात्रंदिवस फिरून शेळ्या मेंढ्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ करतो. आमच्या संसाराचा गाडा त्यांच्यावर चालतो. विषबाधा झाल्याने 149 शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी.
– काळुराम बरकडे, मेंढपाळ
या कळपात एकून 403 शेळ्या आणि मेंढ्या होत्या. 28 जानेवारीला कुजून पडलेले शिळे अन्न शेळ्या, मेंढ्यांनी खाल्ले. त्यामुळे कळपातील काही मेंढ्याचे पोट फुगले, तोंडावाटे पाणी येऊ लागले. तपासणी केल्यानंतर विषबाधेने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आमच्या टीमने रात्रंदिवस उपचार केले. त्यामुळे 100 ते 125 शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचले. याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे.
– पशुसंर्वधन विकास अधिकारी
हेही वाचा