प्रादेशिक सहसंचालकांची साखर शाळेस भेट | पुढारी

प्रादेशिक सहसंचालकांची साखर शाळेस भेट

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी मजुरांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांसह लहान मुलांचे शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या साखर शाळेस भेट देऊन पुणे विभाग प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी पाहणी केली. या वेळी द्वितीय विशेष लेखा परीक्षक पांडुरंग मोहोळकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे, प्र. सचिव मोहन काळोखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लोनवाडे, प्र. ऊस पुरवठा अधिकारी हिरामण गोपाळे, अकाउंटंट विकास आगळे, साखर शाळेचे समन्वयक सचिन वागलगावे, सुपरवायझर महादेवी राऊत, तसेच शिक्षिका लता दुड्यार, श्रीलता सोनवणे, स्वाती क्षीरसागर, शीतल शहाणे, दीपाली येडके उपस्थित होते.
प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी साखर शाळेसंदर्भात देत असलेल्या सवलती तसेच शाळेमध्ये मुलांना शिकवणीचा साप्ताहिक तक्ता तयार करून तो बोर्डवर लावावा. मुलांसाठी पोषक आहार, शालेय साहित्य तसेच ज्या ऊस तोडणी मजूर ज्या गावांतून आले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे दाखले रुजवात करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार ऊस तोडणी मजुरांना राहण्यासाठी व्यवस्था, पाणी, दवाखाना, आरोग्य शिबिर आदी सुविधा राबविण्याबाबत सूचना केल्या.

कारखान्याच्या वतीने पिण्याचे शुध्द पाणी, वीज, राहण्यासाठी तंबू, लहान मुलांच्या शिक्षणासाठी साखर शाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावर दवाखान्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कारखाना ऊस तोडणी मजुरांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची पाहणी करून कारखाना राबवत असलेल्या योजनांबाबत समाधान व्यक्त केले.

दरम्यान, श्री संत तुकाराम साखर कारखान्याचा 26 वा गळीत हंगाम सुरू असून, दि. 24 जानेवारीअखेर 2,81,300 मे. टन ऊस गळीत झालेले असून 3,07,550 क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. सरासरी साखर उतारा 11.09% इतका असून, 24995700 युनिट वीजनिर्मिती झाली आहे. ऊस तोडणी व वाहतुकीसाठी चाळीसगांव, आष्टी, पाथर्डी, पाटोदा, जामखेड, गेवराई, नांदगांव, पाचोरा, शिरूर कासार इ. तालुक्यांतून ऊस तोड वाहतूक यंत्रणा आलेली आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक पठारे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button