

जावेद मुलाणी
इंदापूर : उजनी जलाशयातील गोड्या पाण्यातील मत्स्य प्रजातींचा संशोधकांनी शोध घेतला असता माशांच्या 56 प्रजातींची नोंद झाली असून, चक्क बम्हपुत्रा आणि गंगा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या मत्स्य प्रजातीदेखील प्रथमच उजनी जलाशयात नोंदविण्यात आल्या आहेत, हे विशेष!(Latest Pune News)
उजनी जलाशयाच्या अथांग जलसागरातील मत्स्यवैविध्याचा दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला आहे. नोंद केलेल्या 56 प्रजातींपैकी आठ प्रजाती या कृष्णा नदी खोऱ्याला प्रदेशनिष्ठ असून, सहा प्रजाती या ‘आययूसीएन’च्या लाल यादीत समाविष्ट आहेत.
पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भीमा नदीवरील उजनी धरण हे अत्यंत महत्त्वाचे मानवनिर्मित पाणथळ क्षेत्र आहे. पक्षी स्थलांतराच्या मध्य आशियाई उड्डाण मार्गावरून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला ‘महत्त्वपूर्ण पक्षी क्षेत्रा’चा (आयबीए) दर्जा दिला आहे. गेल्या काही वर्षात या पाणथळ क्षेत्रात परदेशी मत्स्यप्रजातींनी आपले बस्तान बसवले आहे.
या पार्श्वभूमीवर ‘उजनी’तील मत्स्य विविधतेचा आढावा घेण्यासाठी डॉ. रणजित मोरे (इंदापूर महाविद्यालय), गणेश मारकड (मॉडर्न कॉलेज, पुणे), डॉ. विनोद काकडे (दिवेकर कॉलेज, वरवंड) आणि प्रा. डॉ. जीवन सरवडे (प्राचार्य, इंदापूर महाविद्यालय, इंदापूर) यांनी संयुक्तपणे अभ्यास केला. उजनी जलाशयातील मत्स्यप्रजातींचे सर्वेक्षण करून त्यांनी लिहिलेला शोधनिबंध नुकताच ’जर्नल ऑफ थेटनेड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.
’उजनी’तील मत्स्यप्रजातींचे सर्वेक्षण हे सर्वप्रथम 1990 साली सिंग आणि याझदानी (भारतीय प्राणी सर्वेक्षण केंद्र, पुणे) यांनी केले होते. या सर्वेक्षणात त्यांना 40 प्रजाती आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनीच 2002 साली केलेल्या अभ्यासात 54 प्रजातींची नोंद झाली होती. त्यानंतर सरवदे आणि खिल्लारे यांनी 2010 साली केलेल्या अभ्यासात माशांची संख्या 60 एवढी नोंदविण्यात आली होती. त्यानंतर उजनी धरणातील माशांवर कोणीही आतापर्यंत वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केलेला नव्हता.
एप्रिल 2021 ते मार्च 2023 या कालावधीत पार पडलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना जलाशयात 39 वंश, 18 कुल आणि 12 गणातील माशांच्या प्रजाती आढळल्या. तर ’पारआंबसिस लाला’ ही गंगा व बम्हपुत्रेच्या खोऱ्यात आढळणारी आणि ’गॅगेटिक लीफफीश’ ही गंगेच्या खोऱ्यात आढळणारी प्रजात प्रथमच उजनी जलाशयात आढळल्याची नोंद संशोधकांनी केली आहे. परदेशी प्रजातींमधील दक्षिण अमेरिकन ’सकरमाउथ’ मासा, तिलापिया आणि मांगूर या प्रजाती स्थानिक माशांवर विपरीत परिणाम करत आहेत. याशिवाय पर्यटन, वाळू उपसा, औद्योगिक सांडपाणी व प्रदूषणामुळे जलाशयातील परिसंस्थेवर ताण वाढत आहे. काही डोंगरी प्रवाहात आढळणाऱ्या स्थानिक माशांच्या प्रजाती आता उजनी धरणातून लोप पावत आहेत.
जगात केवळ भारतामध्ये सापडणाऱ्या ’कोलूस बार्ब’, ’पेनिस्युलर ऑस्टियोबामा’, ’भीमा ऑस्टियोबामा’, आणि ’नुक्ता’ या प्रजाती या सर्वेक्षणामधून नोंदविण्यात आल्या. यामधील ’नुक्ता’ ही प्रजात ’आययूसीएन’च्या लाल यादीत संकटग््रास्त प्रजात म्हणून नामांकित करण्यात आलेली आहे.
’पिरापिटिंगा’ ही प्रजात सर्वेक्षण काळात कमी संख्येत आढळली, तर ’मोझांबिक तिलापिया’ ही परदेशी प्रजात सर्वाधिक संख्येने आढळली. तर यापूर्वीच्या सर्वेक्षणात आढळलेल्या लोच प्रजातीमधील ’शिस्टुरा डेनिसोनी’, ’गुंटिया लोच’, ’नेमाचेलस बोटिया’या प्रजाती आणि काही डोंगरी प्रवाहात आढळणाऱ्या ’मलबार बारील’ , ’भारतीय हिल ट्राउट’ आणि ’डे बारील’ या प्रजाती आताच्या सर्वेक्षणात आढळून आल्या नाहीत.
फोटो: 1)चिलापी, 2)नंदूस, 3)सुकेरपरंबसिस लाला