

इंदापूर : सर्वत्र होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणाच्या 17 मोऱ्यांतून 80 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, पावसानुसार हा विसर्ग कमी-अधिक करण्यात येणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
धरणातून शनिवारी (दि. 27) पहाटे 25 हजार, साडेपाच वाजता 40 हजार, तर दुपारी दीड वाजता 1 लाख क्युसेक अशी टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता तो विसर्ग कमी करून 80 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
उजनी धरणातून भीमा नदीतील पाण्याचा विसर्ग धरणसाखळीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या कमी-अधिक किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीपात्रालगत कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून, सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घ्यावी, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे.
उजनी धरणामध्ये सायंकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये 119.32 टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 55.56 टीएमसी असून, धरण 103.90 टक्के क्षमतेने भरलेले आहे. तसेच, धरणातून बोगद्यामध्ये पाण्याचा विसर्ग 200, सीना-माढा उपसा जलसिंचन योजना 180 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर मुख्य कालवा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून विसर्ग बंद आहे.
सध्या धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येत असलेले 80 हजार व वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत असलेले 1600 क्युसेक तसेच अनेक ओढ्या-नाल्यांचे पाणी हे नदीपात्रात येत आहे. दरम्यान, दौंड येथून भीमा नदीपात्रामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा 9096 क्युसेक एवढा आहे.