

पुणे : नवरात्रीतील नऊ दिवस अंबाडीची भाजी आणि पोळी असे एक अन्नाचे व्रत करून दसऱ्याच्या दिवशी पांडुरंगाच्या पालखीसोबत जागर करणारे एक अनोखे गाव आहे, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका-जगताप. अनोखी परंपरा या गावाने जपली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास अनेक लोक करतात. मात्र, अंबाडीची भाजी नवरात्रीत वर्ज्य असतानाही ती भाजी आणि पोळी खाऊन अख्खे गाव आगळे-वेगळे नवरात्र साजरे करते. गावातील संत पांडुरंग महाराज यांनी ही प्रथा गावकऱ्यांना घालून दिली आहे..(Latest Pune News)
गावाला आहे जुना इतिहास
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वेपासून सुमारे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर बागायती शेती असणारे गाव म्हणजे जळका-जगताप. हे गाव अनेक गावांना जोडणारे असून, नागपूर-तिवसा रस्त्याला लागून आहे. या गावची लोकसंख्या सुमारे 2200 (दोन हजार दोनशे) इतकी आहे. शेती हाच गावकऱ्यांचा व्यवसाय असून, पूर्णा नदी जवळच असल्याने गाव दूध-दुभते आहे. गावात दूध, दही यासह उत्तम खवा तयार होतो.
पांडुरंग महाराजांनी पेरले भक्तीचे बीज
जळका-जगताप हे गाव फार छोटे असून, लोकसंख्या अवघी 2200 आहे. गावात फारशी मंदिरे नाहीत; मात्र मध्यवस्तीत जुन्या काळातील गढीवजा वाडे असून, ते पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या मातीत बांधलेले आजही दिसतात. गावाच्या मध्यभागी पंढरीच्या पांडुरंगाचे पुरातन मंदिर आहे. तेथे अवघे गाव रोज दर्शनासाठी येते. याच गावात पांडुरंग महाराज नावाचे मोठे संत राहात असत. त्यांनी नवरात्रीचा वेगळा उत्सव गावात सुरू केला.
दसऱ्याला सर्व गावकरी करतात जागरण
नवरात्रीचे नऊ दिवस गावकऱ्यांची चूल बंद असते. सर्व जण दिवसभर उपवास करतात आणि सायंकाळी अंबाडीची भाजी अन् पोळी तयार करून प्रसाद भोजन घेतात. दिवसभर मंदिरात नामस्मरण, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू असतात. या गावात संत पांडुरंग महाराजांचे समाधी मंदिर असून, दसऱ्याच्या दिवशी दोन पालख्या निघतात. एक पालखी विठ्ठलाची असते तर दुसरी संत पांडुरंग महाराजांची असते. रात्रभर पालखी ग्रामप्रदक्षिणा करते. त्यावेळी गावकरी पालख्यांचे दारासमोर रांगोळ्या काढून औक्षण करून स्वागत करतात. दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता हा पालखी सोहळा संपन्न होतो.
नवरात्रात खरे तर अंबाडीची भाजी खात नाहीत. मात्र, आमच्या गावात वेगळी प्रथा आहे. नवरात्रात दिवसभर गावकरी काहीही खात नाहीत. चूल बंद असते. सायंकाळी मात्र अंबाडीची भाजी अन् पोळी प्रसाद म्हणून सर्व जण तयार करतात अन् तोच प्रसाद म्हणून खातात. नोकरीनिमित्ताने गावाबाहेर गेलेले लोकही हा उत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून येतात. दसऱ्याला रात्रभर सर्व गावकरी पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
अतुल सातपुते, तरुण शेतकरी, जळका-जगताप