वेल्हे : रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत, वरसगाव खोऱ्यात शनिवारी (दि. 27) दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणाच्या विसर्गात रात्री 9 वाजता 6 हजार 864 क्सुसेकपर्यंत वाढ करण्यात आली.(Latest Pune News)
सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 29.05 टीएमसी म्हणजे 99.65 टक्के साठा झाला होता. पावसाचे प्रमाण वाढल्यास मुठा नदीच्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या चार-पाच दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक कमी झाली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 26) दुपारपासून रिमझिम सुरू झाली. धरण परिसरापेक्षा घाटमाथ्यावरील डोंगरी पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. शनिवारी दिवसभरात पानशेत येथे 9, वरसगाव येथे 9, खडकवासला येथे 5 व टेमघर येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला.
सध्या वरसगाव धरणातून 1 हजार 197, पानशेतमधून 1 हजार 95 तर टेमघर धरणातून 300 क्सुसेकने पाणी सोडले जात आहे. या पाण्यासह धरण क्षेत्रातील ओढे -नाल्यांतील पाण्याची खडकवासला धरणात आवक वाढली आहे. त्यामुळे जादा पाणी सोडूनही खडकवासलाची पाणीपातळी 95 टक्क्यांवर कायम आहे..