आदिवासी महिलांचा पाण्यासाठी वणवण; कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे गावे तहानलेलीच

आदिवासी महिलांचा पाण्यासाठी वणवण; कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे गावे तहानलेलीच
Published on
Updated on

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, चिल्हेवाडी, येडगाव, वडज ही मोठी धरणे असून या धरणांमधून सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, याच तालुक्यात आदिवासी भागात दरवर्षी टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येतो, हा विरोधाभास नसून वस्तुस्थिती असून, आदिवासींचा पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील ओतूर (ता. जुन्नर) च्या उत्तरेकडील कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे ही गावे व वाड्या- वस्त्या आहेत.

येथील लोकसंख्या सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त आहे तर पेसा कायद्यांतर्गत दोन ग्रुप ग्रामपंचायतीदेखील आहेत. गावांना मुबलक पाणी मिळावे यासाठी अनेकदा विविध प्रकारचे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. आम्हाला गावात धरण किंवा मोठा तलाव बांधून देण्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे. त्यासाठी आम्ही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावादेखील केला आहे; मात्र समस्या सुटता सुटत नाही. सद्य:स्थितीत गावाला दिवसातून किमान पाच टँकरच्या खेपांची आवश्यकता आहे, परंतु त्याची पूर्तता काही होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोरडे नळ आणि पाइपलाइन

आमच्या घरामध्ये पाण्याचा कोणताही पुरवठा नाही आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यात घाईने व कामाला दर्जा नसलेल्या पाइपलाइन टाकल्या जात आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत 'हर घर जल हर घर नल'चे काम प्रगतीपथावर आहे. मात्र आमच्या नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी येणार कसे? फक्त शासनाची योजना आहे म्हणून ती राबविण्याचा केविलवाना प्रयत्न सध्या तरी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे मत कोपरे-जांभुळशीचे ग्रामपंचायत सदस्य उमेश माळी यांनी व्यक्त केले.

मतदानाच्या वेळी सगळे आमच्यापर्यंत पोहचतात; मात्र निवडणुका संपल्या की आदिवासी पट्ट्यातील गावांकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. सरकारविषयी असलेली अनास्था महिलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

रोहिणीताई माळी, सरपंच, कोपरे

माझं आयुष्य पाण्याभोवतीच फिरत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात पाण्याचाच विचार असतो. माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा पाणी आणण्यात जातो. फक्त माझाच नाही तर माझ्या गावातल्या इतर बायकांचाही संपूर्ण दिवस पाणी शोधण्यात
खर्च होतो.

यमुनाताई बांगर, गृहिणी, काठेवाडी

कोपरे-मांडवे पाणी प्रश्न हा ज्वलंत प्रश्न असूनही याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात प्रशासन व नेतेमंडळी कायम उदासीनता दाखवत आहेत. आदिवासी समाजाकडे मतदानापुरते पाहिले जाते. त्यांना आमच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

सुनील माळी, सामाजिक कार्यकर्ता

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news