पंतप्रधान नरेंद्र मोदी आज-उद्या महाराष्ट्रात; तब्बल 6 सभा घेणार | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज-उद्या महाराष्ट्रात; तब्बल 6 सभा घेणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकांच्या तिसर्‍या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभा होणार आहेत.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभांबाबत माहिती दिली. सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे, कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ दुपारी 3:35 वाजता, पुणे येथील सभा संध्याकाळी 5:45 वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होईल. ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या सुनेत्रा पवार व शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे.

तर, मंगळवारी 30 एप्रिला दुपारी 11:45 ला माढा येथील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे, दुपारी दीड वाजता धाराशिव येथे अर्चना पाटील यांच्यासाठी, तर दुपारी 3 वाजता लातूर येथे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होईल, असे बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Back to top button