पिंपरी : आरामदायी बसने प्रवास, सावधान..! पोलिसांकडून प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन

पिंपरी : आरामदायी बसने प्रवास, सावधान..! पोलिसांकडून प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन
Published on: 
Updated on: 

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये पिंपळे सौदागर येथील एकाच कुटुंबातील तिघींना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर 'पुढारी'ने उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातून बाहेर जाणार्‍या स्लीपर कोचसह आरामदायी बसचा आढावा घेतला. त्या वेळी तब्बल 156 खासगी बसेस शहरातून प्रवासी घेऊन बाहेर पडत असल्याचे समोर आले. यामध्ये वाकड आणि निगडी परिसरातून धावणार्‍या बसेसची संख्या सर्वाधिक आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची कामगारनगरी, उद्योगनगरी अशी ओळख आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव, आळंदी- मरकळ आणि हिंजवडी हा औद्योगिक पट्टा येतो. हिंजवडी, तळवडे परिसरात आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्या आहेत. अशा प्रकारे तब्बल 1400 मोठ्या कंपन्या शहर परिसरात सुरू असल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले दीड ते पावणेदोन लाख कामगार या ठिकाणी काम करीत आहेत.

दरम्यान, कामाच्या शोधात आलेली हजारो कुटुंबीय शहरातच स्थायिक झाल्याचे पहावयास मिळते. मात्र, उन्हाळी सुटी आणि मोठ्या सणांना ही कुटुंबे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी बसथांब्यांवर गर्दी करतात. यामध्ये विशेष करून रात्रीच्या वेळी झोपून (स्लीपर कोचमध्ये) प्रवास करणारे मंडळी जास्त आहेत. त्यामुळे अलीकडे दिवसा धावणार्‍या आरामदायी बससोबतच स्लीपर कोचची संख्याही वाढत आहे.

उद्योगनगरीतून स्लीपर कोचसह आरामदायी बस मोठ्या संख्येने प्रवासी घेऊन जात असल्याने पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रात्रीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी चालकाशी संवाद साधावा. चालकाची मानसिक स्थिती तसेच आणि मद्यपान तर केले नाही ना, याबाबत खातरजमा करावी. तसेच, शक्य झाल्यास वाहनाचे 'फिटनेस सर्टिफिकेट'देखील पाहावे. प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी आपल्या गप्पा किंवा इतर काही गोष्टी चालकाला वाहन चालवताना अडथळे निर्माण करणार नाहीत, याचीदेखील खबरदारी घ्यावी.

भाविकांचीही आरामदायी बसला पसंती

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात देहू आणि आळंदी अशी मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे देशभरातून वर्षभर भाविक या ठिकाणी येत असतात. जास्त अंतरावरून येणारे बहुतांश भाविक आरामदायी बसला पसंती देतात. त्यामुळे शहरात प्रवाशांची कमी भासत नसल्याचे बसचालक सांगतात.

पोलिसही घेणार आढावा

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस शहरातून धावणार्‍या स्लीपर कोचसह सर्व आरामदायी बसचा आढावा घेणार आहेत. यामध्ये सर्व बसचे फिटनेस सर्टिफिकेटसह अन्य कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत, तपासली जाणार आहेत; तसेच रात्रीच्या वेळी शहरातून बाहेर पडणार्‍या स्लीपर कोचवरील चालकांची 'ब—ेथ अ‍ॅनालायझर'ने अचानक तपासणी होणार आहे. यामध्ये कुठेही निष्काळजीपणा आढळून आल्यास चालकांसह मालकांवरही थेट गुन्हे
दाखल करण्यात येणार आहेत.

खासगी बसची संख्या

सांगवी – 16
हिंजवडी – 4
निगडी – 35
चिंचवड – 11
भोसरी – 22
चाकण – 13
वाकड – 55
एकूण – 156

समृद्धी महामार्गावर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार्‍या स्लीपर कोचसह सर्व आरामदायी बसेसची कागदपत्रे तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच, रात्री अपरात्री अचानक भेटी देऊन चालकांची ब—ेथ अ‍ॅनालायझरद्वारे अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे. यामध्ये चालकाने मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, यापुढे नागरिकांना प्रवासादरम्यान काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्यांनीदेखील तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी.

-विठ्ठल कुबडे,
सहायक पोलिस आयुक्त,
पिंपरी- चिंचवड

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.